
कोल्हापूर:कोल्हापुरातील एका नामांकित हॉटेलमध्ये जेवणात पाल सापडल्याचा बहाणा करून कांगावा करणाऱ्या तरुणांचे कारस्थान हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याने उघडकीस आले आहे. दोन दिवसांपासून सोशल मीडियावर जेवणामध्ये पाल सापडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याबद्दल हॉटेल प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज देत हा निव्वळ बदनामीसाठी चा कांगावा होता असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या गोष्टींचा तीव्र निषेध हॉटेल मालक संघाच्या वतीने सदस्य उमेश राऊत यांनी केला असून लवकरच यात गुन्हा दाखल करणार असल्याचे हॉटेलचे मालक निवास बाचुळकर यांनी सांगितले आहे. शनिवारी रात्री दहा ते बारा तरुणांचा ग्रुप संबंधित हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. त्यानंतर या तरुणांनी आपल्या मोबाईलवर जेवणामध्ये पाल सापडल्याचा व्हिडीओ शूट करत तरुणांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. यावेळी तिथे हॉटेलचे मालक आले असता संबंधित तरुणांनी कर्मचाऱ्यांसह हॉटेल मालकांवर हात उचलला. या प्रकाराने गोंधळ सुरू झाल्यानंतर इतर ग्राहकांना त्रास होत असल्याने हॉटेल प्रशासनाने मारामारी करणाऱ्या तरुणांना हॉटेल बाहेर काढले. या संधीचा फायदा घेऊन हॉटेलचे नाव टाकून बनवलेला व्हिडिओ या तरुणांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. ही नाहक बदनामी टाळण्यासाठी हॉटेलने सीसीटीव्ही फुटेज संपूर्ण पत्रकार परिषदेत दाखवले. यामध्ये असे दिसून येत आहे की बसलेल्या तरुणांपैकी एका कडेला बसलेल्या तरुणाने जेवण सुरू असताना प्रथमतः मित्राची व्हेज डिश आपल्यासमोर घेतली. नंतर डाव्या हाताने पाठीमागील खिशातून पाल काढून ती त्या भाजी मध्ये टाकली. नंतर सीसीटीवीमध्ये अस्पष्ट दिसू नये म्हणून ती भाजी मिक्स करून घेतली. यानंतर ती व्हेज खाणाऱ्या मित्राजवळ पाठवली. यावेळी ते मित्र त्यातील भाजी वाटून घेऊन त्यामधील पाल शोधू लागतो. पण त्याला ते सापडत नाही. यावेळी शेजारचा मित्र ते पाल शोधून काढतो. आणि समोरच्या मोकळ्या डिशमध्ये ठेवून दुसऱ्या मित्राला व्हिडिओ बनवायला सांगतो. हा सगळा घटनाक्रम सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने स्पष्ट करून संबंधितांवर कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही हॉटेलचे मालक निवास बाचुळकर यांनी सांगितले आहे. हा सर्व नियोजित कट असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पत्रकार परिषदेला निर्मल पटेल, मनोज पुरोहित, अमर पाटील, प्रसाद कामत यांच्यासह हॉटेलचे सर्व कर्मचारी होते.
Leave a Reply