
कागल:येत्या आठ मार्चच्या महिला दिनापासून आठ जूनपर्यंत सबंध महाराष्ट्रभर तीन महिने समृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबवणार, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. महिला अबला नाहीत, त्या सबला आहेत. यापुढे त्यांना अजून सक्षम करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.कागल पंचायत समितीच्या आवारात महिला स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्री केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन मंत्री श्री. मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते झाले.मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, समाजातील विकासाच्या महिलाही निम्म्या हक्कदार आहेत, या जाणिवेतूनच महिलांच्या सक्षमीकरणासाठी ग्रामविकास विभागाच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रभावीपणे सुरू आहे.खासदार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, राजकारणाचे विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या कागलचे विकासाचे विद्यापीठ म्हणून ओळख व्हावी, एवढे सुंदर चित्र निर्माण झाले आहे. गेल्या वर्षभरात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अनेक क्रांतिकारक लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. ग्रामविकासाच्या विभागाच्या अंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणासाठी हाती घेतलेली महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानही महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
Leave a Reply