
मुंबई : कुंभार समाजाचा संपूर्ण व्यवसाय, माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसवर अवलंबून आहे. परंतु, प्लास्टर ऑफ पॅरिसवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे कुंभार समाजाचे अतोनात नुकसान होत आहे. कुंभार समाजाला गणेश मूर्ती करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसशिवाय पर्याय नाही. यासह गेल्या दोन वर्षात महापूर आणि कोरोनामुळे कुंभार बांधवांवर कर्जाचा डोंगर झाला आहे. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसवर घालण्यात आलेली बंदी शासनाने उठवावी आणि कुंभार समाजास न्याय द्यावा, अशा आशयाचे निवेदन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली कुंभार समाजाच्या शिष्ठमंडळाने शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री.एकनाथ शिंदे यांची भेट घेवून सादर केले. याप्रसंगी झालेल्या बैठकीत शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांच्या भावना गणेशोत्सवाशी जोडल्या असून कुंभार समाजावर अन्याय होवू देणार नाही, प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी हटविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या सोबत लवकरच राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्याची ग्वाही नगरविकास मंत्री.एकनाथजी शिंदे यांनी कुंभार समाजाच्या शिष्ठमंडळास दिली.
यावेळी कुंभार समाजाच्या वतीने बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष.राजेश क्षीरसागर यांनी, कुंभार समाजाचा आर्थिक कणा हा गणेशोत्सव सन आहे. गणेशोत्सव जरी ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये होत असला तरी त्याची पूर्वतयारी वर्षाच्या सुरवातीस करावी लागते. गणेश मूर्ती बनविण्यासाठी माती उपलब्ध होत नसल्याने मूर्ती सुबक आणि दर्जेदार बनण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस हेच एक माध्यम आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी झालेला महापूर आणि गतवर्षीचा कोरोना यामुळे कुंभार समाजाच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असून, कुंभार बांधव कर्जबाजारी झाले आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये केमिकल्स नाहीत. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे पर्यावरणाची हानी होत नाही, असे पुरावे आहेत. हरित लवादानेही सन २०१३ मध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे प्रदूषण होत नसल्यास मान्यता दिली आहे. या धर्तीवर पर्यावरण विभागाने प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर झाल्यास नगरविकास विभागाने कारवाई करावी, असा कायदा आहे. एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्यातील नगरविकास विभागांतर्गत येणाऱ्या महानगरपालिका व नगरपालिका यांनी कुंभार समाजावर कारवाई करू नये असे आदेश द्यावेत, तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी उठवावी अशी मागणी यावेळी केली.
यावेळी बोलताना नगरविकास मंत्री
.एकनाथ शिंदे यांनी, कुंभार समाजावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही, असे आश्वासित केले. शिवसेना, ठाकरे कुटुंबिय आणि समस्त शिवसैनिकांच्या भावना गणेशोत्सवाशी जोडल्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये गणेश मूर्ती घडविणाऱ्या कुंभार समाजावर कोणताही अन्याय होणार नाही. यासाठी मुख्यमंत्री.उद्धव ठाकरे पर्यावरण मंत्री.आदित्य ठाकरे साहेब यांच्या सोबत लवकरच राज्यस्तरीय बैठक आयोजित करू, असे आश्वासन कुंभार समाजाच्या शिष्ठमंडळास दिले.
यावेळीकुंभार समाजाच्या शिष्ठमंडळामध्ये कोल्हापूर कुंभार समाजाचे माजी महापौर मारुतीराव कातवरे, संभाजी माजगावकर, अनिल निगवेकर, सतीश बाचणीकर, रवी माजगांवकर, सुनिल माजगांवकर, शिवाजीराव वडणगेकर, पुणे कुंभार समाजाचे प्रवीण बावदणकर, पेण कुंभार समाजाचे अभय म्हात्रे, कैलास पाटील, हेमंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
Leave a Reply