शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

 

कोल्हापूर: प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री तसेच जमीन सपाटीकरणाबाबत जलसंपदामंत्री यांच्याकडे लवकरच बैठक घेतली जाईल. शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा ठाम विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिला.
आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात आज बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन, गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, भूसंपादन अधिकारी हेमंत निकम आदी उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यावेळी म्हणाले, मागील बैठकीत सांगितल्यानुसार प्रश्ननिहाय अर्ज देण्यास सांगितले होते. यामध्ये 41 अर्ज आले होते. सकारात्मक दृष्टिकोनातून 95 टक्के अर्ज मान्य केले आहेत. एकूण 359 लोकांना जमीन पॅकेज वाटप केले आहे. 30 लोकांना अंशत: जमीन वाटप केले आहे. एकूण 50 कोटींचे वाटप झालेले आहे. उर्वरित प्रकल्पग्रस्तांसाठी बुधवार हा दिवस प्रातांधिकाऱ्यांनी दिला आहे. आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडविण्यासाठी दर बुधवारी प्रांताधिकारी वेळ देणार आहेत. 33 हेक्टर जमिनीबाबत स्थगिती आहे ती उठल्यानंतर वाटपाबाबत निर्णय घेतला जाईल.
निर्वाह भत्ता 65 टक्के रक्कमेवरील व्याज याबाबत आठ दिवसात कार्यवाही होईल. जमिन सपाटीकरणाबाबत जलसंपदा मंत्री यांच्याकडे बैठक लावली जाईल, तसेच मदत व पुनर्वसनाबाबतही शासन स्तरावर बैठक घेतली जाईल, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, जमीन किंवा स्वेच्छा पुनर्वसन यापैकी एक फायदा घ्यावा, दोन्ही घेवू नये. जमिनीबाबतच्या वहिवाटीचा अडथळा निश्चितपणे दूर केला जाईल. त्या प्रकल्पग्रस्तांना उच्च न्यायालयाने पाठवलेल्या प्रकरणांबाबत तपासून निर्णय घेतला जाईल.प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याबाबत निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
प्रांताधिकारी श्रीमती पांगारकर यांनी यावेळी आलेल्या 41 अर्जांबाबत आढावा दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!