‘गोकुळ’ च्या निवडणूक रिंगणात आता राजर्षी शाहू शेतकरी आघाडी

 

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ’गोकुळ च्या निवडणुकीसाठी आता राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घोषणा नुकतीच करण्यात आली. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीमध्ये आज विश्रामगृह येथील पत्रकार परिषदेत पालकमंत्री सतेज पाटील यांनी गोकुळची निवडणूकित आता राजर्षी शाहू शेतकरी आघाडी उतरणार आहे असे स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी गोकुळची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढवणार आहोत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर सर्वजण एकत्र येऊन निवडणूक लढवली जाणार असून आ. राजेश पाटील, आ. प्रकाश आबिटकर हेदेखील आमच्यासोबत आहेत, असे त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे गोकुळला वैभव प्राप्त करून देणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. यासाठी शेतकरी समाधानी असणे आवश्यक आहे. म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपये ज्यादा दर कसा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू असेही पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. सुरुवातीपासूनच महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविण्यात यावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. तसेच सत्ताधारी गटाचे नेते आ. पी. एन. पाटील यांच्याशी आमची चर्चा सुरू होती. पण आम्हाला त्यामध्ये यश आले नाही. आणि निवडणुकीच्या तोंडावर कोणताही गाफीलपणा होऊ नये म्हणून आम्ही सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. आणि एकत्र आलो आहोत.आनंदराव पाटील-चुयेकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही मोठ्या ताकतीने ही निवडणूक लढवत आहोत, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. तसेच उपस्थित आमदार विनय कोरे यांनी मागच्या वेळी दोन जागा निवडून आल्या होत्या. आता ह्याच संघर्षाने मोठे स्वरूप धारण केलेले आहे. आज संपूर्ण पॅनेल तयार करून निवडणूक लढवली जाणार आहे. महाविकास आघाडी म्हणून जरी लढत असलो तरी या निवडणुकीत पूर्ण महाविकास आघाडी म्हणता येणार नाही. या निवडणुकीत मी भाजपचा घटक पक्ष म्हणून काम करणार आहे.असे सांगितले. पत्रकार परिषदेला आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर, जनसुराज्यचे प्रवक्ते विजयसिंह जाधव, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, विद्यमान संचालक अरुणकुमार डोंगळे, विश्वास पाटील, जयश्री पाटील, माजी आमदार के.पी. पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!