
कोल्हापूर : रामराज्यातील प्रजा धर्माचरणी होती; म्हणूनच तिला श्रीरामासारखा सात्त्विक राज्यकर्ता लाभला आणि आदर्श असे रामराज्य उपभोगता आले. नित्य धर्माचरण आणि धर्माधिष्ठित राज्यकारभार यांद्वारे आदर्श राज्यकारभार करणारा मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे प्रभु श्रीराम होय. प्रजेचे जीवन संपन्न करणारे; गुन्हेगारी, भ्रष्टाचार आदींना स्थान नसलेले अशी रामराज्याची ख्याती होती. असे आदर्श राज्य रामनवमीच्या निमित्ताने स्थापण्याचा निर्धार करूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. ते श्रीराम नवमीच्या दिवशी आयोजित ऑनलाईन श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात बोलत होते. या सोहळ्यासाठी ५०० हून अधिक रामभक्तांची उपस्थिती होती.
या सोहळ्यात ऑनलाईन श्रीराम नामजप, श्रीरामाचा पाळणा ऐकणे, श्रीरामाची आरती आणि नंतर श्रीरामरक्षा स्तोत्र घेऊन रामराज्यासाठी प्रतिज्ञा घेऊन सोहळ्याची सांगता करण्यात आली.
श्री. किरण दुसे पुढे म्हणाले, ‘‘श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या तिथीला नेहमीपेक्षा १ सहस्र पटीने कार्यरत असलेल्या श्रीरामतत्त्वाचा लाभ मिळण्यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप अधिकाधिक करावा. धर्माच्या सर्व मर्यादा पाळणारा अर्थात् ‘मर्यादापुरुषोत्तम’, आदर्श पुत्र, आदर्श बंधु, आदर्श पति, आदर्श मित्र, आदर्श राजा, आदर्श शत्रु असा सर्वार्थाने आदर्श ठरेल असा कोण, असे विचारताच डोळ्यांसमोर नाव येते ते म्हणजे ‘श्रीराम’ ! आदर्श राज्याला आजही रामराज्याचीच उपमा देतात.’’
Leave a Reply