
कागल:योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळेच कोरोनाची दुसरी लाट आली आणि सर्वत्र हाहाकार माजला आहे, अशी चिंता ग्रामविकास मंत्री व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. कागल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील १०० बेडच्या अद्ययावत कोरोना हॉस्पिटलच्या लोकार्पण कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. आतातरी खबरदारी घ्या व कोरोनाची तिसरी लाट रोखा, असे आवाहनही त्यांनी केले.येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात डॉ. अमर पाटील यांनी हे शंभर बेडचे अद्ययावत हॉस्पिटल सुरू केले.मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, या हॉस्पिटलमध्ये येणारा प्रत्येक रुग्ण जगलाच पाहिजे व आनंदाने हसत मुखाने घरी गेला पाहिजे, या भावनेने सर्वांनी काम करा. संक्रमणाची गती मोठी आहे, त्यामुळे खबरदारी हाच एकमेव इलाज आहे.
या हॉस्पिटलमध्ये शासनाने आखून दिलेल्या नियमावलीच्या निम्म्या दरात उपचार होणार आहेत. एकूण 100 बेड आहेत. त्यामध्ये एच. आर. सिटी स्कोर २० पेक्षा जास्त असणाऱ्या रुग्णांसाठी गंभीर रुग्ण- एक व्हेटीलेटर बेड, उच्च दाब ऑक्सीजन मशीन बेड -दोन, ऑक्सीजन सह अतिदक्षता बेड- १५, एच. आर. सिटी स्कोर १२ ते २० असणाऱ्या रुग्णांसाठी सेमी आयसीयू बेड पुरूषासाठी -१६ व सेमी आयसीयू बेड स्त्रियासाठी -१६. तसेच एच. आर. सिटी स्कोर ० ते १२ असणाऱ्या रुग्णांसाठी जनरल वॉर्डमध्ये पुरुष बेड -१६ व स्त्री बेड -१६ अशी विभागणी असणार आहे. ज्या रुग्णांचा स्वॅब रिपोर्ट आलेला नाही त्यांच्यासाठी आठ बेडचा अलगीकरण कक्षही स्वतंत्र उभारला आहे.यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, ग्रामीण रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता डी. व्ही. शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.स्वागत नगरसेवक प्रविण काळबर यांनी केले. आभार डॉ. अमर पाटील यांनी मानले.
Leave a Reply