
कोल्हापूर : गोकुळच्या सत्तारुढ गट दूध उत्पादकांना उत्पन्नातील ८२टक्के परतावा देत असल्याचे सांगत आहे. वास्तविक पाहता व्यवस्थापन खर्चात बचत करुन देशातील अनेक संघांनी ८५ ते ९२ टक्के इतका परतावा दिलेला आहे. या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला विजयी करुन सत्ता द्या; दूध उत्पादकांना ८५ % परतावा देऊ असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे.पत्रकात पुढे म्हटले आहे की, रंगनाथन समितीच्या शिफारशीनूसार ऊस उत्पादकांना उत्पन्नातील परतावा देताना ७०:३० हा फॉर्म्युला वापरावा असे नमूद केले आहे. हा फॉर्म्युला दूधासाठी नाही. दुधासाठी परतावा देताना उत्पादन खर्च वगळता सर्व परतावा दूध उत्पादकांना देणे अपेक्षित आहे. सत्तारुढ गट मात्र ऊसाचा फॉर्म्युला दुधासाठी वापरुन आपली पाठ थोपटून घेत आहे.गोकुळचा विचार करता गोकुळला चांगल्या प्रतीच्या दुधाचा पुरवठा होतो. म्हैस दुधाचे प्रमाणही गोकुळकडे जास्त आहे. तसेच दूध संकलनासाठी वाहतूक खर्च तलुनेने कमी आहे. पण सत्तारुढ गटाने केलेल्या गैरकारभारामुळे व्यवस्थापन खर्चात वाढ झाली आहे. दररोज १४ लाख लिटर दूध संकलन होत असताना २० लाख लिटर संकलन गृहीत धरुन विस्तारीकरण केले आहे. त्याप्रमाणात नोकर भरती, मशिनरी खरेदी केली आहे. याचा अतिरिक्त भार गोकुळवर पडला आहे. कार्यक्षेत्राबाहेरील दूध गोळा करुन ते संघाकडे आणल्याने कोट्यावधींचे नुकसान होते. लेखापरीक्षण अहवालानूसार कार्यक्षेत्राबाहेरील दूध संकलनामुळे 2015-16 या वर्षात संघाला 24 कोटी 44 लाख, 2016-17 या वर्षात 50 कोटी तर 2017-18 या वर्षात 64 कोटी 77 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.या गोष्टी ध्यानात घेवून गोकुळचा कारभार पारदर्शी करण्यासाठी आम्ही कटीबध्द राहणार आहोत. आदर्श गोठे निर्माण करुन दूध पुरवठा वाढविणे, दूध संस्थांना प्रोत्साहन देणे या गोष्टी आम्ही निश्चितपणे करु, असेही त्यांनी नमूद केले आहे.
Leave a Reply