
कागल:कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारपासून आठवडाभर कडक लॉकडाऊन सुरू होत आहे. या लॉकडाऊनमध्ये घरातच रहा, कुणीही बाहेर पडू नका आणि कोरोनाचा संसर्ग रोखा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. लॉकडाऊनमध्ये नियमबाह्य फिरणाऱ्या कुणाचीही गय करू नका, अशा सक्त सूचनाही त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. मृत्यूदर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने लसीचा पुरवठा सुरळीत करावा, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.कागलमध्ये डी. आर. माने महाविद्यालयाच्या प्रांगणात कोरोनाच्या आढावा बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, कागल तालुक्यात एकूण पाचशे बेडची व्यवस्था असेल. कागल शहरात ४५० पैकी १२० बेड ऑक्सिजनचे असतील व मुरगूड शहरातील ५० पैकी ३० बेड ऑक्सिजनचे असतील. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला जादाचा ऑक्सिजन पुरवठा व चौपट ते पाचपट वाढीव रेमडीसिवेहीर इंजेक्शनमुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. कोरोनाची तिसरी लाट येणारच नाही, यासाठी सर्वांनी दक्षता घेऊया. आलीच तर ऑक्सिजनसह लहान मुलांसाठीही सज्जता ठेवावी लागेल. सध्या भारतात असलेला बी – १६१७ हा विषाणू खतरनाक असून दोन ते तीन दिवसातच या विषाणूच्या संसर्गचा वेग प्रचंड वाढतो, असे ते म्हणाले. मागणी आणि गरजेच्या तुलनेत लसीची उपलब्धता कमी असल्याचे सांगताना श्री. मुश्रीफ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर आता बोललेच पाहिजे.
Leave a Reply