
मुरगूड:सध्या २५ बेड असलेल्या मुरगुडच्या ग्रामीण रुग्णालयात ५० बेडस ऑक्सिजन जनरेटर प्लांट व सिटीस्कॅन यासह अन्य अनुषंगिक सुविधा ठरविणार असल्याची ग्वाही, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मुरगुडमध्ये कोरोना परिस्थितीची आढावा बैठक व नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने कोविड केअर केंद्राला १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन प्रदान अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. मुश्रीफ पुढे म्हणाले, अनपेक्षितपणे आलेल्या या जागतिक महामारीशी गेल्या सव्वा वर्षापासून आपण लढत आहोत. पहिली लाट संपल्यानंतर पुन्हा हा रोग येणार नाही, असं वाटलं होतं. त्यानंतर धार्मिक कार्यक्रम, समारंभ, निवडणुका यामध्ये खबरदारी घेतली नाही व त्याचे दुष्परिणाम दुसऱ्या लाटेत रूपांतर होण्यामध्ये झाले. अहोरात्र लढणाऱ्या सरकारी डॉक्टर्स व आरोग्य यंत्रणेचेही मंत्री मुश्रीफ यांनी कौतुक केले. आरोग्य व्यवस्था भक्कम केली नाही तर पुढच्या लाटेला फार गंभीर परी तोंड द्यावे लागेल. तज्ञांच्या अभ्यासानुसार तिसऱ्या फेरीत लहान मुलांना फार धोका आहे. आपण आताही त्याच चुका पुन्हा केल्या तर समाज आपल्याला माफ करणार नाही. जोपर्यंत लसीकरण पूर्ण होणार नाही तोपर्यंत तिसऱ्या लाटेचा धोका आपल्याला कायम आहेच.
Leave a Reply