
कोल्हापूर: जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथील कुडाळकर हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांची आर्थिक फसवणूक व पिळवणूक केली जात आहे. लक्षणे नसणाऱ्या कोरोना रुग्णांकडून ते पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांपर्यंत व इतर उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांकडून लाखो रुपये उपचारा खातर घेऊन रुग्णांची लूट केली जात आहे. अशा गोरगरीब रुग्णांची लूट करणार्या डॉक्टरांवर जिल्हा प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना वडगाव शहर प्रमुख संदीप पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
कुडाळकर हॉस्पिटलमध्ये जयसिंग जाधव हा रुग्ण गेले दहा दिवस उपचारासाठी दाखल होता. या जाधव रुग्णांकडून वेळोवेळी हॉस्पिटलकडून हजारो रुपये जमा करून घेण्यात आले. सदर रक्कम जमा करण्यास विलंब झाल्यास सदर रुग्णाचा ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात येईल अशी धमकी देखील संबंधित डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना दिली होती. अखेर या रुग्णास या हॉस्पिटलमधून इतर हॉस्पिटलमध्ये हलवले. पण दुर्दैवाने यामध्ये या रुग्णाचा मृत्यू झाला. तसेच वेळोवेळी भरलेल्या रकमेची पावती मागितली असता त्यांना फक्त नव्वद हजार रुपयांची पावती देण्यात आली. परंतु या रुग्णांच्या नातेवाइकांकडून तब्बल तीन लाख सत्तर हजार रुपये उपचारात खातर जमा करून घेतलेले आहेत. अशाच अनेक रुग्णांच्या बाबतीत हे घडलेले आहे. पावती एका रकमेची व त्याच्यात जवळजवळ दुप्पट ते तिप्पट रक्कम हॉस्पिटलने भरून घेतलेली आहे.
सदर रक्कम कशासाठी भरून घेतली असे नातेवाईकांनी विचारले असता त्यांना सरळ उत्तरे दिली जात नाहीत. तसेच उपचारादरम्यान कोणत्याही स्वरूपाचा ऑक्सीजन किंवा वेंटिलेटरचा वापर करण्यात आलेला नाही. गोरगरीब लोकांनी दागिने विकून बिल जमा केले आहे. अशाप्रकारच्या लूट करणाऱ्या हॉस्पिटलवर कडक कारवाई करून त्यांची प्रशासकीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी संदीप पाटील यांनी केली आहे.
Leave a Reply