
कोल्हापूर : गेली सव्वा वर्षे संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सातत्याने कोविड रुग्ण सेवा कार्य सुरु आहे. दिनांक ३० मे रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७ वर्षाच्या पूर्ती निमित्य संपूर्ण देशभर “सेवा ही संघटन” या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोविड रूग्णांची सेवा व त्यांच्या नातेवाईकांना मदत, आशा वर्कर सन्मान व स्वच्छता अभियान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत आहे. कोल्हापूर येथे आज ‘सेवा ही संघटन’ कार्यक्रमा मध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थिती दर्शवली. भाजपा शिवाजी पेठ मंडलाच्यावतीने निवृत्ती चौक येथे आशा वर्करना प्रशस्ती पत्र व भेटवस्तू वितरीत करण्यात आले. याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस हेमंत आराध्ये, महिला जिल्हाध्यक्षा गायत्री राउत, माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, आज मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना सात वर्ष पूर्ण झाली आहेत. सध्याच्या कोरोनाच्या संकटामुळे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा न करता ‘सेवा ही संघटन’ अशा सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करायचा आहे. आज संपूर्ण देशाभरात एक लाख गावात अशा पद्धतीचे कार्यक्रम सुरु आहेत. आशा वर्कर, नर्सेस, सफाई कर्मचारी, डॉक्टर, पोलीस, बँक कर्मचारी अशा कोविड योध्यांचा सन्मान आणि सत्कार आजच्या दिवशी होत आहे. कोविडच्या गंभीर परिस्थतीमध्ये प्रत्यक्ष लोकांच्या घरापर्यंत जाऊन कोविडच्या परिस्थितीशी भिडण्याचे कार्य आशा वर्कर महिलांच्या माध्यमातून होत आहे. अनेक अशा वर्कर कोरोनाने संक्रमित झाल्या तरीही न डगमगता हे मोठे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून त्यांनी जे कार्य सुरु ठेवले आहे त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन केले. कार्यक्रमानंतर आशा वर्कर महिलांच्यावतीने आशा वर्कर म्हणून मिळणाऱ्या मानधनामध्ये वाढ होण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली. यानंतर पद्मावती मंदिर नजीक सार्वजनिक स्वस्छ्ता गृहाची सफाई ठिकाणी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पीपीई कीट घालून सॅनीटायझर फवारणी केली.
Leave a Reply