
कोल्हापूर : एकीकडे संपूर्ण जिल्ह्यात कोरोना रोगाने थैमान घातले असताना, अनेक डॉक्टर्स, नर्सेस देवदूताप्रमाणे सेवा देत आहेत. परंतु, डॉ.कौस्तुभ वाईक आणि डॉ.अनुष्का वाईकर यांच्या सारख्या एक – दोन टक्के डॉक्टरांमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा बदनाम होत आहे. सुमारे १० ते १२ तक्रारी असताना महापालिका प्रशासनाकडून कारवाई होत नाही. हा एकप्रकारे डॉक्टर कौस्तुभ वाईकरला पाठीशी घालण्याचा प्रयत्न असून, अजून किती नागरिकांचे बळी घेणार असा सवाल करीत रुग्णांची लुट करून आरोग्य यंत्रणा बदनाम करण्याचा प्रयत्न पुढील काळात खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला. रिंग रोड येथील सिद्धांत हॉस्पिटल संदर्भात तक्रारदार आणि महापालिका प्रशासन यांची बैठक पार पडली.बैठकीच्या सुरवातीस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सिद्धांत हॉस्पिटलबाबतच्या सर्व तक्रारी आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. राजेश क्षीरसागर यांनी, कोरोना महामारीच्या काळामध्ये राज्य शासनाच्या निर्देशाने समस्त आरोग्य यंत्रणा देवदूताप्रमाणे काम करत आहे. त्यांच्या कार्याचे नक्कीच कौतुक केले पाहिजे पण, कोल्हापूर शहरातील डॉ.कौस्तुभ वाईकर आणि सौ.अनुष्का वाईकर यांच्या सिद्धांत हॉस्पिटलकडून रुग्णांची आर्थिक फसवणूक, चुकीचे उपचार केले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. डॉ.वाईकर यांच्या चुकीच्या उपचारामुळे रुग्णांना जीव गमवावा लागल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. डॉ.कौस्तुभ वाईकर यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त असून, यापूर्वी त्यांच्यावर अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. कोव्हीड काळात शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून या रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून लाखोंची बिले वसूल करून लुट केली जात आहे. तक्रार देवूनही महापालिका अधिकारी कारवाई करत नाहीत.
यावेळी बोलतना उप- आयुक्त निखील मोरे यांनी, शासनाने दिलेल्या अॅपवर रुग्णालयांनी कोव्हीड रुग्णांची सर्व माहिती भरणे आवश्यक असल्याचे सांगितले. पण, सिद्धांत हॉस्पिटल कडून अशी कोणतीच माहिती प्रशासनास सादर केलेली नाही त्यामुळे त्यांना नोटीस देण्यात आली पण, त्यावर त्यांनी कोणतेच उत्तर न दिल्याने त्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला असून, या रुग्णालयातील कोव्हीड वॉर्ड तातडीने बंद करण्याचा आदेश महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे. त्यानुसार या रुग्णालयातील कोव्हीड सेंटर बंद करण्यात येणार असल्याची माहिती दिली.बैठकीस माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप आयुक्त निखील मोरे, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे आरोग्य अधिकारी अशोक पोळ, शहर अभियंता नारायण भोसले, मुख्य लेखापरीक्षक वर्षा परीट, आदी उपस्थित होते.
Leave a Reply