संपूर्ण जिल्ह्यातील व्यापार सुरू करण्यास परवानगी द्यावी:ललित गांधी;पालकमंत्री यांच्याकडे केली मागणी

 

कोल्हापूर : शहरातील व्यापार सुरू करण्यास दिलेल्या परवानगीचे आम्ही स्वागत करत असून याच धर्तीवर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ च्या वतीने वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केली. मंगळवारी ललित गांधी यांनी मुंबई येथे पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधीचे निवेदन दिले.शहरातील व्यापार सुरु करण्यास परवानगी मिळवून दिल्याबद्दल पालकमंत्री व सर्व संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचे आभार मानून ललित गांधी यांनी सांगितले की जिल्ह्यातील इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, गांधीनगर, हुपरी, आजरा, चंदगड, राशिवडे, बांबवडे, कोडोली, पेठ वडगाव, मुरगूड, कागल, या प्रमुख बाजारपेठांच्या गावाबरोबरच संपूर्ण जिल्ह्यातील व्यापार ठप्प असल्याने जिल्ह्याचे अर्थकारण बिघडले आहे. सलग तीन महिन्याचा लॉक डाऊन व्यापाराची घडी मोडणारे ठरला आहे. राज्याच्या व्यापारात जिल्ह्याचा वाटा टिकून ठेवण्यासाठी कोल्हापूर शहराप्रमाणेच संपूर्ण जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषद यासह ग्रामपंचायत स्तरावरील व्यापारही सुरू होणे अत्यंत आवश्यक असल्याचे आग्रही प्रतिपादन ललित गांधी यांनी केले.पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची मागणी योग्य असल्याचे सांगून, जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधींच्या समवेत बुधवारी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन लवकरात लवकर हा व्यापार सुरू करण्यास परवानगी मिळवून देऊ असे सांगितले.संपूर्ण जिल्ह्यातील व्यापार लवकर सुरू हवा अशीच आपली भूमिका असल्याचे सांगून, शासनाच्या निकषांमध्ये पात्र होण्यासाठी जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ च्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव असीम कुमार गुप्ता यांच्याकडेही मागणी करण्यात आली.
यावेळी झालेल्या बैठकीत ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ चे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्या समवेत गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य संदीप भंडारी, डी.सी.सोळंकी व अन्य मान्यवर ही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!