
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या निवडणुकीमध्ये शब्द दिल्याप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या ११ जुलैपासून म्हशीच्या दुधाला २ रु. प्रतिलिटर व गाईच्या दुधाला १ रु. प्रतिलिटर दरवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील सर्वसामान्य दूध उत्पादकांनी गोकुळचा कारभार करण्याची संधी दिल्यांनतर गेल्या ४५-५० दिवसांमध्ये अनेक बैठका घेत सविस्तर चर्चा करून शेतकरी बांधवांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.
गोकुळ दूध संघ सक्षमपणे पुढे घेऊन जाण्यासाठी संघाच्या खर्चामध्ये बचत करणे गरजेचे होते, त्यामुळे अनावश्यक होणाऱ्या खर्चामध्ये कपात करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्यामुळे मुंबई येथील जागा गोकुळ दूध संघाला मिळणार आहे. मुंबई येथील दूध विक्रीसाठी महानंद डेअरीशी सामंजस्य करार केल्याने दुधाचे *पॅकिंग खर्चामध्ये प्रति लिटर १२ पैसे कमी झाल्याने वार्षिक १ कोटी १८ लाख, ८० हजार रुपयांची बचत होणार आहे.
सोबतच, पशुसंवर्धन, पशुखाद्य, दूध वाहतूक, दुग्ध शाळा, अतिरिक्त कामगार अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चेनंतर घेतलेल्या निर्णयांमुळे गोकुळ संघाची वार्षिक सुमारे १३ कोटी रुपयांची बचत होणार आहे.यासोबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्या विद्यमाने ५०० ते १००० कोटी रुपयांपर्यंत मुऱ्हा, जाफराबादी, पंढरपुरी म्हैस खरेदीसाठी कर्ज उपलब्ध होणार आहे.तसेच, कोरोनाच्या पाश्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत गोकुळ संघाने ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला होता. येत्या २५ जुलैपासून या ऑक्सिजन प्लांट मधून ऑक्सिजन निर्मितीस सुरवात होणार आहे.याबद्दल पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली तसेच कोल्हापूर विभाग सोडून ईतर सर्व ठिकाणी २ रुपये विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.गोकुळ चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी संजय मंडलिक, आमदार प्रकाश अबीटकर,राजेश पाटील,राजू आवळे,ऋतुराज पाटील,के.पी.पाटील, ए. वाय. पाती आदी उपस्थित होते.
Leave a Reply