
कोल्हापूर/ प्रतिनिधी: १९७५ साली स्थापन झालेल्या राजर्षी शाहू ब्लड बँक म्हणजेच राजर्षी शाहू ब्लड सेंटरने गेल्या ४५ वर्षात मानवतेचा महायज्ञ केला आहे. तसेच पुण्याचे काम, समाजसेवेचे काम केले आहे. म्हणूनच कोणतेही व्यावसायिक हेतू न ठेवता सेवाभाव हेच वेगळेपण या ब्लड सेंटरने जोपासले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. राजर्षी शाहू ब्लड सेंटरचे नवीन वास्तूत स्थलांतर सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कोल्हापुरात इतके वर्ष या ब्लड बँकेने अतिशय कौतुकास्पद कार्य केले आहे. कोल्हापूरकरांना कधीही रक्ताची कोणत्याही गटाच्या रक्ताची चणचण भासू दिली नाही. लोक स्वेच्छेने रक्तदान करतात. ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे. हे ब्लड सेंटर अद्ययावत करण्यासाठी NAT या यंत्रणेसाठी शासनाच्या मदती करिता मी स्वतः लक्ष देईन. तसेच 350 मिली रक्ताच्या पिशव्या ऐवजी संपूर्ण राज्यभरात 450 मिली रक्ताच्या पिशव्या दिल्या जातील. आणि सेवाभाव जपणार्या अशा ब्लड बँकांना दर तीन महिन्याला योग्य ती मदत शासनाकडून मिळेल असेही मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. यावेळी प्रास्ताविकात अध्यक्ष व्हि.बी. पाटील म्हणाले “पंचेचाळीस वर्षांमध्ये फक्त कोल्हापूरकरांसाठी या ब्लड बँकेने रक्त उपलब्ध करून दिले आहे. शुद्ध रक्त मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. ही गरज नेहमीच राजर्षी शाहू ब्लड बँकेने पूर्ण केलेली आहे. तसेच शासनाकडे ब्लड बँक चालवण्यात येणाऱ्या काही अडचणींचा पाढा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यापुढे वाचला. मंत्री राजेश टोपे यांनी लगेचच त्यावर अंमलबजावणी करून अडचणी सोडवण्याची ग्वाही दिली.
ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले “कोल्हापूरकरांसाठी अशी अद्ययावत सेवा असणे ही अभिमानाची गोष्ट आहे. म्हणूनच रक्तदान हेच जीवनदान आहे. रक्त मिळण्याचे हमखास ठिकाण म्हणजे शाहू ब्लड सेंटर. लोकांसाठी ही संस्था असून निरपेक्षपणे काम करणारी आहे. यात कोणताही व्यावसायिक उद्देश नाही.
यावेळी जास्तीत जास्त वेळा रक्तदान करणार्या तसेच प्लाजमा दान करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल रेखावार, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील, ब्लड सेंटरचे सचिव महेंद्र परमार, खजानिस राजू पारिख आदी उपस्थित होते.
Leave a Reply