नागरिकांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन लोकप्रतिनिधींना दिसत नाही का? ‘आप’चा आ.ऋतुराज पाटील यांना सवाल

 

कोल्हापूर: रामानंदनगर येथील ओढ्याचे पाणी आज आजूबाजूच्या घरांमध्ये शिरले. दोन दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीने तिथे रास्ता रोको करून हा प्रश्न महापालिकेच्या नजरेस आणून दिला होता. गेली 2 महिने यावर महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. आज पाणी शिरल्याने दक्षिणचे आ. मा. ऋतुराज पाटील, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी त्याठिकाणी येऊन पाहणी केली. यावेळी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी “गेली 25 वर्षे हा प्रश्न प्रलंबित आहे, मूळ समस्या सुटली नसल्यामुळे आम्ही गेली 2 महिने आंदोलन करत आहे. हे सगळं लोकप्रतिनिधींना, नगरसेवकांना दिसत नाही का? परवा दिवशी आम्ही येथे आम्ही रास्ता रोको केला. हौस आहे म्हणून का?” असा प्रश्न आ. ऋतुराज पाटील यांच्यासमोर उपस्थित केला. यावर आ. पाटील निरुत्तर झाले.लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतील तर त्याचा आम्हाला आदरच आहे, परंतु प्रश्न सुटला पाहिजे असे देसाई म्हणाले. रामानंदनगर, जाधव पार्क या भागातील 250 घरांमध्ये पाणी शिरते. दरवर्षी प्रापंचिक साहित्याचे नुकसान होते, नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागते. वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्नाची सोडवणूक महापालिका आतातरी करेल का असा सवाल परिसरातील नागरिक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!