
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात दोन वर्षापूर्वी महापुराने थैमान घातले. पूरग्रस्तांना महापालिकेने घरफाळा व पाणीपट्टी माफ करण्यासाठी ठराव केला. शहरातील सुमारे साडेतीन हजारांवर मिळकतधारकांना त्याचा लाभ होणार आहे; परंतु प्रशासन कागदपत्रांच्या खेळातच रमले आहे. दोन वर्षे उलटून गेली तरीही अद्याप संबंधितांना सवलत दिलेली नाही. सद्यस्थितीत कोरोनामुळे सर्वांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे. परिणामी महापुरातील नुकसानग्रस्तांना अद्याप सवलत का दिलेली नाही, अशी विचारणा करीत २०१९ सालच्या महापुरातील नुकसानग्रस्तांना तात्काळ कर सवलत द्या, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांना ई-मेल द्वारे दिल्या आहेत.गेल्या दोन वर्षापूर्वी अतिवृष्टीमुळे महापूर आला. तब्बल वीस ते बावीस दिवस महापुराच्या पाण्याने शहरातील अनेक भागांना वेढा घातला होता. यात शहरातील तीन हजारांवर घरांचा समावेश होता. त्याबरोबरच दुकानगाळे व इतर प्रॉपर्टीही होत्या. काही घरे पूर्ण पडली. साडेतीन हजारांवर घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी, या सर्वांचा २०१९-२०२० मधील घरफाळा १०० टक्के व ५० टक्के याप्रमाणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पूरग्रस्तांची ऑगस्ट-सप्टेंबर २०१९ मधील पाणीपट्टी पूर्ण माफ करण्याचाही निर्णय झाला. सुमारे तीन हजारांवर पाणीपट्टीधारकांना त्याचा लाभ मिळाला आहे. मात्र अद्याप घरफाळ्यात सवलत दिलेली नाही. घरफाळ्याची आहे तशीच बीले आलेली आहेत. परिणामी नागरिकांनाही ती बीले भरताना अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे तात्काळ या बाबीकडे आपण गांभीर्याने लक्ष देवून शहरातील महापुरात बाधित झालेल्या नुकसानग्रस्तांना तात्काळ कर सवलत देणेबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
Leave a Reply