
कोल्हापूर: युथ डेव्हलपमेंट या बँकेवरील निर्बंध मार्च 2020 अखेर उठवले. यानंतर या बँकेला तब्बल मार्च 2021 अखेर 6.35 कोटीचा नफा झाला आहे. रिझर्व बँकेने निर्बंध पूर्णपणे उठवल्यानंतर यशस्वीरित्या कामकाज करणारी आणि 5.45% नफा मिळवून विक्रम प्रस्थापित करणारी युथ बँक ही महाराष्ट्रातील पहिलीच बँक आहे असे बँकेचे तज्ञ संचालक चेतन नरके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यूथ बँकेची 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पार पडली. त्यावेळी बँकेचे तज्ञ संचालक चेतन नरके यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला.ते म्हणाले युथ बँक ही गरिबांची बँक आहे.बहुजनांची बँक आहे. कोरोना काळात छोटे व्यावसायिक, व्यापारी यांना छोटी कर्ज वाटप करून त्यांच्या व्यवसाय उभारणीला मदत या बँकेने केलेली आहे. बँकेला 6.35 कोटी इतका नफा झाला असून एनपीए शून्य टक्के आहे.चालू आर्थिक वर्षात नवीन सभासदांमध्ये वाढ झाली असून आठ लाख रुपयांचे भाग खेळत्या भांडवलात वाढ झाली आहे. बँकेच्या ठेवी 74 कोटी रुपयांच्या असून गेल्या सहा महिन्यात 14 कोटींचे नवीन कर्ज वाटप केले आहे. बँकेची प्रगती पाहून शासकीय लेखापरीक्षकांनी गत सालच्या परीक्षण वर्गीकरणा मध्ये सुधारणा करून ‘ब’ वर्ग दिला आहे. बँकेने आकर्षक ठेव व्याजदराच्या योजना जाहीर केल्या आहेत. शिवाय सर्वसामान्य गरजवंतांना सोनेतारण व वाहनतारण कर्ज योजनेचे कामही चालू आहे, असेही चेतन नरके यांनी सांगितले. कार्य प्रणालीमध्ये बदल करून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून निर्बंध आणण्यात आलेल्या बँकेला एवढ्या मोठ्या प्रमाणात पुन्हा नफ्यामध्ये आणण्याची ही बहुतेक पहिलीच घटना असावी. बँकेतील ठेवीदार व सभासदांना यामुळे दिलासा मिळाला आहे.तसेच 500 कोटी रुपयांच्या ठेवींचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे सहकार क्षेत्राला निश्चितच चालना मिळेल, असेही चेतन नरके म्हणाले.
Leave a Reply