
सेनापती कापशी:सलग पाचवेळा आमदार झालो, त्यात २५ पैकी २० वर्षे मंत्रिपदी राहिलो. या वाटचालीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चिकोत्रा खोर्याने मोठी शक्ती दिली, अशी कृतज्ञता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व राष्ट्रवादी जनरल बांधकाम संघटनेच्या बांधकाम कामगार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सौ.शिल्पाताई शशिकांत खोत होत्या. सर्व जिद्दी कार्यकर्त्यांच्या अखंड परिश्रमामुळेच लोककल्याणाच्या योजना घरोघरी पोहोचल्या व त्या यशस्वी झाल्या, असे सांगतानाच मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले अशा कार्यकर्त्यांचा मला सार्थ अभिमान आहे.भाषणात मंत्री मुश्रीफ म्हणाले, गोरगरीब माणसांचा आशीर्वाद आणि पाठबळामुळेच ही संघर्षमय वाट चालत राहिलो. त्या भावनेतूनच यापुढेही सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अहोरात्र कार्यरत राहीन.मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, विविध विकासकामांच्या योजना तळागाळापर्यंत पोचवल्या. जनतेच्या व्यक्तिगत आयुष्यातही अनंत अडचणी असतात. व्यक्तिगत समस्या सोडवण्यावरही सातत्याने भर दिला. सेनापती कापशी येथे सुरू असलेले शूरवीर महान मराठा योद्धे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक येत्या दीड वर्षाच्या आत पूर्ण होईल. त्यामुळे ऐतिहासिक वारसा असलेले सेनापती कापशी हे गाव महाराष्ट्रासह भारताच्या नकाशावर पर्यटन स्थळ म्हणून पुढे येईल.कोरोनाकाळात शशिकांत खोत व शिल्पाताई खोत या पती-पत्नीनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सेनापती कापशी येथे सुरु केलेल्या कोरोना केअर सेंटरचा हजारो रुग्णांना उपयोग होऊन अनेकांचे जीव वाचले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
Leave a Reply