
म्हैसूरमधील ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस’ (CIIL) आणि Bombinate Technologies Pvt Ltd यांनी एका संयुक्त सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. बॉम्बिनेट टेक्नॉलॉजीज ही भारताच्या बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म, कू (Koo)ची होल्डिंग कंपनी आहे. सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासह भाषेच्या योग्य वापराला प्रोत्साहन देण्यासाठी या दोघांनी हा सामंजस्य करार (MoU) केला आहे. भारतीय भाषांच्या विकासामध्ये समन्वय साधण्यासाठी भारत सरकारने CIIL ची स्थापन केलेली आहे. आता CIIL ‘कू’ ॲप सोबत एकत्र काम करणार आहे. यातून भाषिक धोरणे मजबूत होतील आणि सोबतच युजर्सना ऑनलाइन सुरक्षा मिळणे सोपे होईल. यासह हा करार ऑनलाइन गैरकृत्ये, गुंडगिरी आणि धमक्यांपासून रक्षण करण्याच्या दृष्टीनेही उपयोगी ठरेल.
या समूहाद्वारे CIIL हे 22 भाषांमध्ये आक्षेपार्ह किंवा संवेदनशील मानले जाणारे शब्द, वाक्प्रचार, संक्षेप आणि संक्षिप्त शब्दांचा एक समूह तयार करेल. ‘कू’ ॲप हा संग्रह तयार करण्यासाठी गरजेचा डेटा एकत्रित करेल आणि सोबतच असे इंटरफेस तयार करण्यासाठी आवश्यक ती तांत्रिक व्यवस्थाही दोन वर्ष पुरवेल. भारतीय भाषांचा ऑनलाइन समाजमाध्यमांवर आदर्श वापर केला जावा यासाठीची ही दीर्घकालीन मोहिम आहे.
भारतीय भाषांमधील शब्द आणि अभिव्यक्तींचा शब्दकोष विकसित करणे हा CIIL आणि Koo कू संयुक्तपणे करत असलेल्या अभिनव उपक्रमाचा हेतू आहे. भारतामध्ये हा असा प्रयोग पहिल्यांदाच केला जातो आहे.
या घडामोडीचे स्वागत करताना, CIIL चे संचालक प्रा. शैलेंद्र मोहन म्हणाले, समानता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार ही अत्यंत आदरणीय घटनात्मक मुल्यं आहेत. भारतीय भाषेतील युजर्सना ‘कू’च्या मंचावर चर्चा-संवाद करण्यास सक्षम करणे हे खरे पाहता या मुल्यांचेच प्रकटीकरण आहे. CIIL आणि Koo यांच्यातील सामंजस्य करार हा सोशल मीडियाचा, विशेषत: कू ॲपचा वापर, शाब्दिक प्रदुषणविरहीत होईल आणि तो अयोग्य भाषा, गैरवर्तनापासून मुक्त राहिल यासाठीचा एक प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जावे. सोशल मीडियावर मोकळे आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याहेतूने सुरू झालेला हा उपक्रम आहे. ‘कू’च्या या उपक्रमाला प्रोत्साहन देताना प्रा. मोहन म्हणाले की, ‘कू’ ॲपचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत म्हणूनच CIIL शब्दसंग्रहाच्या माध्यमातून ‘कू’बरोबर भाषिक सल्लामसलत करेल. सोबतच प्रगल्भ आणि आदर्श असा ऑनलाइन संवाद प्रत्यक्षात आणण्यासाठी ‘कू’ टीमला बळ देईल.
या संयुक्त मोहिमेवर आधिक प्रकाश टाकताना ‘कू’ॲपचे सहसंस्थापक आणि सीईओ अप्रमेय राधाकृष्ण म्हणाले, “कू हा भारतीयांना अनेक भाषांची गोडी लावत परस्परांशी जोडून घेण्याची सुविधा देणारा अनोखा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आम्ही आमच्या युजर्सना सतत एक आदर्श पर्यावरण देण्याचा प्रयत्न करतो. जसे की, इथे ऑनलाइन अवकाशाचा गैरवापर आणि गैरवर्तन प्रभावी पद्धतीने रोखले जाते. आमच्या युजर्सनी विविध भाषिक संस्कृतीतून आलेल्या लोकांशी अर्थपूर्ण संवाद साधण्याच्या हेतूने हा मंच वापरावा अशी आमची इच्छा आहे. CIIL सोबत एकत्र येत हा भाषिक संग्रह करत ऑनलाइन विश्व नेटकऱ्यांसाठी अधिक सुरक्षित व विश्वासार्ह बनवण्यासाठी आम्ही काम करू. अतिशय प्रतिष्ठित अशा सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेससोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होतो आहे.”
भारतीय भाषांमध्ये अभिव्यक्तीसाठीचा एक खुला मंच म्हणून ‘कू’ ॲप सध्या नऊ भाषांमध्ये आपल्या अनोख्या सेवा देते आहे. ‘कू’ लवकरच सगळ्या 22 अधिकृत भारतीय भाषांमध्ये आपला विस्तार करेल. CIIL सोबतच्या या उपक्रमात Koo ॲप मातृभाषांमध्ये, विशेषतः सोशल मीडियावर वापरल्या जाणार्या शब्दांचे तर्कशास्त्र, व्याकरण आणि संदर्भ यांवर काम करेल. या सगळ्याची सखोल व सूक्ष्म समज विकसित करेल. वाद आणि ऑनलाईन गुंडगिरीला खतपाणिी घालणारे आक्षेपार्ह शब्दप्रयोग आणि वाक्ये ओळखण्यासही हा प्रयोग उपयोगी ठरेल. मायक्रो-ब्लॉगिंग मंचावरील मजकुरासंदर्भातले नियंत्रण वाढवण्यासह युजर्सना त्यांच्या मातृभाषांमध्ये अधिक प्रभावी लिखाण करण्याचीही चालना यातून मिळेल. सोबतच भारतातील बहुभाषिक सोशल मीडिया मंच म्हणून यातून कू ॲपचे स्थानही बळकट होईल.
सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर इंडियन लँग्वेजेस (CIIL) बद्दल:
CIIL ची स्थापना भारतीय भाषांच्या विकासप्रक्रियेत समन्वय साधण्यासह शास्त्रीय अभ्यासाद्वारे भारतीय भाषांमध्ये आवश्यक संघटन घडवून आणण्यासाठी काम करते. सोबतच आंतरविद्याशाखीय संशोधनाला चालना देणे, भाषांच्या एकमेकांमध्ये होणाऱ्या ज्ञानप्रसारात योगदान देणे आणि अशा प्रकारे भारतीयांमधील भाषिक-भावनिक एकात्मतेला हातभार लावण्याचेही कार्य ही संस्था करते.
काय आहे कू :
‘कू’ची स्थापना मार्च 2020 मध्ये भारतीय भाषांमध्ये बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून झाली. अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध, ‘कू’ विविध क्षेत्रातील भारतीय लोकांना त्यांच्या मातृभाषेत व्यक्त होण्याचा सोपा मार्ग मिळवून देते. ज्या देशातील फक्त १०% लोक इंग्रजी बोलतात, तिथे अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खूप गरज आहे जे भारतीय युजर्सना त्यांच्या भाषेतला अस्सल अनुभव देऊ शकेल, त्यांना एकमेकांशी जोडून ठेवेल. भारतीय भाषांमध्ये संवाद साधायला प्राधान्य देणाऱ्या भारतीयांच्या आवाजासाठी ‘कू’ एक मंच मिळवून देतो.
Leave a Reply