स्त्री आरोग्य तज्ज्ञांच्या संघटनेचे कार्य प्रशंसनीय: आयुक्त कादंबरी बलकवडे

 

कोल्हापूर/प्रतिनिधी :कोल्हापूरमधील स्त्री आरोग्य तज्ञांच्या संघटनेची मासिक शैक्षणिक सभा नुकतीच संपन्न झाली. गेल्या अठरा महिन्याच्या अवकाशानंतर झालेल्या सभेत कोविड महामारीच्या काळात अथक काम करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा (स्त्रीरोग विभाग) सन्मानचिन्ह देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या .या काळात सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये प्रसुती विभागात कोल्हापूरातील स्त्री आरोग्य तज्ञांच्या संघटनेच्या सर्व सदस्यांनी ऐच्छिक सेवा, विनामोबदला उपलब्ध करून दिली. कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही सेवा उपलब्ध झाल्याने सावित्रीबाई फुले हॉस्पिटल मध्ये येणार्‍या रुग्णांची खूपच सोय झाली. त्याची दखल घेऊन स्त्रीरोगतज्ञ यांच्या संघटनेच्या माजी अध्यक्षा डॉ. मंजुळा पिशवीकर व सध्याच्या अध्यक्षा डॉ. निरुपमा सखदेव यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सरकारी व खाजगी सेवेतील तज्ञांच्या सहकार्याने कोरोनाच्या अवघड काळातील प्रसूती कक्षातील काम पार पडू शकले. असे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आपल्या भाषणात नमूद केले.या सभेत डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा कोरोना काळात केलेल्या अथक कामासाठी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे प्रा.गोडबोले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ.शानबाग,कार्यकारिणी सदस्य डॉ. सुरुची पोवार, डॉ.ज्योत्स्ना देशमुख, डॉ.मीरा कुलकर्णी,डॉ.विभावरी जोगळेकर,डॉ.इंद्रनील जाधव उपस्थित होते.संघटनेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. राधिका जोशी, डॉ. प्रतिभा भूपाळी, डॉ. चांदेलकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!