
कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गांधीनगरसह 20 गावांसाठीच्या सुधारित नळपाणीपुरवठा
योजनेत समाविष्ट केलेल्या सर्व गावातील लोकांशी चर्चा करूनच या योजनेबाबत निर्णय घेणे संयुक्तिक ठरणार आहे . या योजनेला अद्याप कोणतीही प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. पण या योजनेला निधी मंजूर झाल्याची माहिती देऊन त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न राजेश क्षिररसागर करत आहेत. कोल्हापूर दक्षिण मतदासंघातील या पाणीयोजनेचे श्रेय घेणारे क्षिररसागर कोण ? त्यांचा या योजनेशी काय संबंध ? असा प्रश्न आमदार ऋतुराज पाटील यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की , महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशन योजनेतून कोल्हापूर दक्षिण मतदासंघातील गांधीनगर सह उंचगाव, पाचगाव, मुडशिंगी , वळीवडे, वसगडे,सरनोबतवाडी,नेर्ली, तामगाव उजळाईवाडी आदी २० गावांसाठी सुधारित पाणीपुरवठा योजना प्रस्तावित केली आहे.
याबाबत पालकमंत्री सतेज पाटील तसेच मी स्वतः पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. डिसेंबर महिन्यात या योजनेला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. पण योजनेत समाविष्ट 20 गावांपैकी नेर्ली, तामगाव ,कणेरीवाडी सांगवडे, सांगवडेवाडी,हलसवडे, चिंचवाड, वसगडे या आठ गावातील लोकांनी या योजनेत समाविष्ट होण्यास नकार दिला आहे . या योजनेची पाणीपट्टी आम्हाला परवडणार नाही. तसेच या योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी वार्षिक ७ कोटी खर्च येणार आहे, असे या गावातील लोकांचे म्हणणे आहे.याबाबत सर्व २० गावातील लोकांशी चर्चा करून संयुक्तिक निर्णय घेऊन पुढील पाऊल टाकणे अपेक्षित आहे. ही चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात पालकमंत्री सतेज पाटील व मी या सर्व गावातील लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी यांची बैठक पुढील आठवड्यात घेण्याचे नियोजन केले आहे.
गांधीनगर सुधारित पाणीयोजनेबाबत ही वस्तुस्थिती असताना क्षीरसागर यांनी मात्र आपल्या पाठपुराव्यामुळे 137 कोटींची ही योजना मंजूर होऊन त्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे माध्यमांना सांगितले आहे. वास्तविक या योजनेत समाविष्ट सर्व २० गावांनी अद्याप याबाबत मान्यता दिलेली नाही. मग ती योजना मंजूर कशी होईल? त्याला निधी कसा उपलब्ध कसा होईल ? तसेच माझ्या दक्षिण मतदारसंघातील पाणी योजनेला निधी मंजुरीची जाहीर घोषणा करण्याची घाई क्षिरसागर यांना का झाली आहे ? असा सवालही आ.पाटील यांनी उपस्थित केला आहे.
Leave a Reply