
कोल्हापूर:गोकुळ दूध संघाच्या संचालिका सौ.शौमिका महाडिक यांनी अर्धवट माहितीच्या आधारे बेछूट आरोप केले आहेत. त्यामधून गोकुळची होणारी बदनामी आम्ही खपवून घेणार नाही. आमचे नेते ग्रामविकास व कामगार मंत्री नामदार हसन मुश्रीफसाहेब, गृह राज्यमंत्री व पालकमंत्री नामदार सतेज उर्फ बंटी पाटीलसाहेब यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघाची धुरा आमच्याकडे आली. कारभार पारदर्शी व स्वच्छ कसा होईल, याकडेच आम्हा सर्वांचा कटाक्ष असतो. प्रत्येक खरेदी – विक्री सेवा याबाबत निविदा काढून संघाचा फायदा कसा होईल, हे आम्ही पाहतो. नवीन संचालक मंडळाने मुंबई वाहतूक टँकर भाडे कपात, अतिरिक्त रोजंदारी कर्मचारी कपात, तसेच महानंदला दिलेले दूध पॅकिंग या माध्यमातून वार्षिक सरासरी दहा कोटींची बचत केली आहे. मागील संचालक मंडळाने दिलेला पशुखाद्य वाहतुकीचा ठेका प्रति मे.टन ७०३ रुपये होता. तर, या संचालक मंडळाने दिलेला वाहतुकीचा ठेका प्रति मे.टन ५३६ रुपये आहे. या पद्धतीने प्रति मे.टन १६७ रुपये बचत होऊन, डिसेंबर २०२१ अखेर एकूण ०१ कोटी १६ लाख रुपयेची बचत झाली आहे. पशुखाद्याच्या आधी केलेल्या नियोजनामुळे २,५०० मे.टन इतकी प्रती महिना मागणी वाढली असून, त्याचा पुरवठा करणे श्री.विठ्ठल रखुमाई सहकारी वाहतूक संस्था मुरगुड व शिवराज ट्रान्सपोर्ट संस्थेस शक्य झाले नाही. त्यामुळे, त्याच दरामध्ये राधानगरी तालुका वाहतूक सहकारी संस्थेकडून काम करून घेतले आहे. यामध्ये कोणती चूक झाली ? या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे दूध संघाचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही.उलट या निर्णयामुळे दूध संस्थाना त्यांच्या मागणी प्रमाणे वेळेत पशुखाद्य पुरवठा करणे शक्य होणार आहे.
गोकुळ दूध संघाचे प्रती दिन संकलन मागील काळामध्ये १३ लाख लिटर होते. ते आमच्या काळामध्ये दूध उत्पादकांच्या पाठबळावर व आम्हा सर्वांच्या प्रयत्नाने सरासरी १७ लाख लिटर्स पर्यंत वाढले असून. लवकरच २० लाख लिटर्स संकलनपुर्तीच्या अमृत कलशाचे पूजनही करणार आहोत.
मुंबईतील विक्रीत घट नव्हे तर दिवसेंदिवस वाढच…….
शौमिका महाडिक यांनी मुंबईतील गोकुळ दुधाच्या विक्रीत घट झाल्याची टीका केली आहे. दरम्यान ‘महाडिकांची ही टीका योग्य नाही. मुंबईत ‘गोकुळ’च्या दूध विक्रीत घट नव्हे तर दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षातील मुंबई विभागातील दूध विक्रीतील वाढीसंबंधीची आकडेवारी बोलकी आहे. मागील संचालक मंडळ काळात मुंबईत दररोज सरासरी ०६ लाख ९१ हजार लिटर दूध विक्री व्हायची. दरम्यान; आमचे संचालक मंडळ सत्तेत आल्यापासून संघाची वितरण व्यवस्था बळकट केल्यामुळे ही विक्री दररोज सरासरी ०७ लाख ७० हजार लिटर पर्यन्त पोहचली असून. दररोज मुंबई येथील दूध विक्री मध्ये सरासरी ७८ हजार ३२२ लिटर्स वाढलेली आहे.गुणवत्तेचा जोरावर मुबंई व पुणे बाजारपेठेत ‘गोकुळ ब्रँड’ निर्माण झाला आहे. मुबंई येथील ग्राहकांच्या पसंतीस गोकुळचे दूध उतरले आहे. यामुळे गोकुळच्या दूध विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. भविष्यातही दूध विक्रीचा आलेख उंचाविण्यासाठी सर्व संचालक मंडळ व अधिकारी कायमच कार्यतत्पर आहेत.त्यामुळे दूध उत्पादक, ग्राहकामध्ये गैरसमज पसरविण्याच्या फंदात पडू नये. चुकीची माहिती देउन सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये.” गोकुळ ब्रँडची स्पर्धाही अमूलशी आहे. हेच आमच्या नेत्यांचे स्वप्न आहे. ते सत्यात आणण्यासाठी, आम्ही सर्व संचालक प्रयत्नशील आहोत
Leave a Reply