
कोल्हापूर/प्रतिनिधी: अतिग्रे इथल्या संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनाकडून मनमानी कारभार सुरू आहे. एकाच वर्गातील मुलांची वेगवेगळे फी आकारून पालकांची आर्थिक फसवणूक केली जाते त्याचप्रमाणे उशिरा फी भरणाऱ्या मुलांना शाळेत येण्यास किंवा ऑनलाईन क्लासना हजर राहण्यास प्रतिबंध केला जातो. शालेय पाठ्यक्रम याची पुस्तके मुलांना दिली जात नाहीत. याबाबत पालकांसोबत चर्चा करायलाही व्यवस्थापन नकार देत आहे. या सर्व प्रकाराला कंटाळून पालक शिक्षक संघटनेच्यावतीने शिक्षणाधिकार्यांकडे तक्रार करण्यात आली आहे, अशी माहिती काही पालकांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन दिली. या स्कूलच्या व्यवस्थापनाद्वारे मनमानी कारभार सुरू असून हुकुमशाही पद्धतीने कारभार या संस्थेने सुरू केला आहे.फी वसूल करतानाही अनेक नसलेल्या सुविधांची फी वसूल केली जात आहे. पालकांचा फी वसुलीसाठी वारंवार अपमान केला जात आहे. उद्धट भाषा वापरून विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव उत्पन्न करणारी वागणूक व्यवस्थापनाकडून दिली जात आहे. पालक शिक्षक संघ व्यवस्थापनाकडून निष्क्रिय ठेवण्यात आलेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पालकांची मीटिंग झालेली नाही. कोणत्याही पालकांना चर्चेत सहभागी करून घेतले जात नाही. परस्पर फी वाढ करून बदललेल्या नियमांची माहिती देखील पालकांना दिली जात नाही. अशा अनेक तक्रारी या स्कूलबद्दल आहेत. व्यवस्थापनाला वारंवार निवेदने व संदेश पाठवूनही व्यवस्थापनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी वरिष्ठ यंत्रणेकडे तक्रार केलेली आहे. शाळा व्यवस्थापनाबाबत असलेल्या तक्रारींची निर्गत करण्यासाठी येत्या आठ दिवसात व्यवस्थापनाने पालकांसोबत संयुक्त बैठक घ्यावी. अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा देखील या पालकांनी दिलेला आहे. अशा पद्धतीने नाहक त्रास होणाऱ्या पालकांची संख्या जास्त आहे. लवकरात लवकर व्यवस्थापनाने यावर निर्णय घ्यावा अशी पालकांची अपेक्षा आहे. पत्रकार परिषदेत दिलीप पाटील, वासुदेव तोतला, भरत तिवारी बाळासाहेब पोवार, शैलेश लुणानी,दीपा डकरे यांच्यासह पालक वर्ग उपस्थित होता.
Leave a Reply