
कोल्हापूर : एक महिन्यानंतर ही कचरा घोटाळ्यात मनपा प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे आणि भाजपाच्या आंदोलनाला अधिकारी सामोरे न आल्यामुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना घेराव घालून प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या मनपा प्रशासनाचा धिक्कार करत कार्यकर्त्यांनी आयुक्त तथा प्रशासक आणि अतिरिक्त आयुक्तांच्या निषेधाच्या घोषणा दिल्यामुळे वातावरण तंग झाले. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानंतर व दोन दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिल्यानंतर आजचे आंदोलन स्थगित करण्यात आले.
एक महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीने उघड केलेल्या कचरा घोटाळ्यातील ठेकेदार व त्यात सहभागी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी भाजपा सातत्याने पाठपुरवठा करत आहे. घोटाळा उघडकीस आणल्यानंतर एक महिना होवून गेल्यानंतरही अजून चौकशी समितीचा अहवाल सादर झाला नसल्यामुळे भाजपाने आज मनपावर धडक देऊन निदर्शने करण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे सकाळी ११ वाजता भाजपाने महानगरपालिकेच्या दारात निदर्शनांना सुरुवात केली. ‘कचरा शेठ करतो काय चुना लावतो दुसर काय’, ‘या कचरा शेठच करायचं काय खाली डोक वर पाय’, ‘कचरा घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या विजय पाटलांना निलंबित करा’, ‘ भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या मनपा प्रशासनाचा धिक्कार असो’, ‘ मनपाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी अधिकारी मात्र उंची गाड्या पळवी’ असे फलक हातात घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणांनी मनपा इमारत हादरवून सोडली. अजित ठाणेकर, हेमंत आराध्ये, गायत्री राऊत,चंद्रकांत घाटगे यांनी आपल्या भाषणात मनपातील भ्रष्टाच्याराचा खरपूस समाचार घेतला. गेल्या काही वर्षात, मनपात गाजलेल्या वेगवेगळ्या घोटाळ्यांची आठवण यावेळी वक्त्यांनी करून दिली. तसेच सध्याच्या कचरा घोटाळ्याची व्याप्ती, त्याचे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम, शेतात पसरलेल्या कचऱ्यामुळे नासाडी झालेली शेजारची शेती, कचरा पसरल्यामुळे होऊ शकणारे जलस्त्रोतांचे प्रदूषण, रेड झोनमध्ये कचरा पसरल्यामुळे होऊ शकणारे पंचगंगेचे प्रदूषण आणि कचरा घोटाळ्यातील ३० ते ३५ कोटींचा ढपला हे सर्व विषय यावेळी विषद करण्यात आले.
सुमारे एक तास चाललेल्या आंदोलनानंतरही अधिकारी सामोरे न आल्यामुळे संतप्त झालेल्या जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी आपल्या भाषणात” भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो. जर अधिकारी आपल्याला भेटायला येत नसतील तर आपण अधिकारी यांना भेटायला जावू” असे म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी मनपात घुसण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर विजय जाधव, गणेश देसाई, प्रदीप उलपे, किशोरी स्वामी यांच्यासह सर्व कार्यकर्ते गेटच्या दिशेने धावले आणि पोलीस व सुरक्षा रक्षकांच्या प्रतिबंध झुगारून मनपा चौकात पोहोचले. त्यानंतर सर्व कार्यकर्ते तसेच आयुक्तांच्या केबिनकडे निघाल्यानंतर काही अधिकाऱ्यांनी त्यांना बैठक कक्षात थांबण्याची विनंती केली. त्या ठिकाणी कार्यकर्ते थांबले व त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. आयुक्तांनी आमच्या समोर यावे असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता परंतु काही वेळाने अतिरिक्त आयुक्त कार्यकर्त्यांसमोर आल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या व आयुक्तांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या व त्यांना घेराव घातला.
“भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अतिरिक्त आयुक्त यांचा निषेध असो” असे म्हणल्यावर अतिरिक्त आयुक्त संतप्त झाले व त्यांनी आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाही असे सांगितले. त्यावर राहुल चिकोडे यांनी पाठीशी घालत नाही तर कारवाई का केली नाही असा प्रश्न केला. ‘माझ्यासहित वरिष्ठ अधिकारी कोरोना बाधित झाल्यामुळे थोडा उशीर झाला’ असे अतिरिक्त आयुक्तांनी म्हटल्यावर तुम्ही नसताना महानगरपालिका बंद पडली का? असा सवाल चिकोडेनी केला. एक महिना झालातरही अजून कारवाई होत नाही याला जबाबदार कोण?, ठेकेदारावर कोणती कारवाई केली?, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसीला काय उत्तर दिले?, सहा सहा वेळा शिष्टमंडळ भेटूनही खोटे का सांगितले? अशा प्रश्नांची सरबत्ती कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर केली. संजय भोसलेनी,”नियमानुसार कारवाई होत असते. त्यामुळे दोन दिवसात अहवाल सादर होईल तितका वेळ द्यावा.” असे म्हणल्यावर कार्यकर्ते आणखीनच संतप्त झाले. आणि त्यांनी पुन्हा घोषणा देण्यास सुरुवात केली.
शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण हे मोठ्या फौजफाट्यासह बैठक कक्षात दाखल झाले व त्यांनी कार्यकर्त्यांना सुवर्णमध्य काढण्याची विनंती केली. परंतु कार्यकर्ते विजय पाटील यांच्या निलंबनावर ठाम होते. शेवटी अतिरिक्त आयुक्तांनी, “प्रत्यक्षात आरोग्य खात्याची जबाबदारी माझी नसली तरीही चौकशी समितीचा प्रमुख म्हणून येत्या शुक्रवारी आम्ही समितीचा अहवाल प्रशासकांना सादर करू. त्यावर कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार प्रशासकांचे आहेत आणि पसरलेल्या कचऱ्याबाबत ठेकेदाराला नोटीस देण्यात आली असून त्याच्या उत्तराचा तसेच तुमच्याकडे अन्य काही पुरावे असल्यास त्याचाही समावेश अहवालात करू” असे सांगितले. त्यावर ठेकेदाराला दिलेल्या नोटीसची प्रत लगेच द्यावी आणि दोन दिवसात अहवाल सादर करून त्याचीही प्रत मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. प्रशासनाने नोटीसची प्रत उपलब्ध करून दिल्यानंतर, दोन दिवसात अहवाल सादर न झाल्यास महानगरपालिकेत घुसून रोज आंदोलन करू असा इशारा देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्रानी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, विजय आगरवाल, किशोरी स्वामी, जिल्हा चिटणीस प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, अजित सूर्यवंशी, सुलभा मुजुमदार, महिला मोर्चा अध्यक्षा गायत्री राऊत, डॉ. राजवर्धन, आशिष कपडेकर, विवेक कुलकर्णी, भरत काळे, अतुल चव्हाण, प्रीतम यादव, सचिन साळोखे, सचिन सुतार, सचिन आवळे, दिलीप बोंद्रे, ओंकार खराडे, विशाल शिराळकर, संजय जासूद, संदीप कुंभार, धीरज पाटील, संतोष गुरव, अनिकेत मुतगी, गणेश चिले, अशोक रामचंदानी, मनोज इंगळे, इक्बाल हकीम, प्रकाश घाटगे, मामा कोलवणकर, सुजाता पाटील, राधिका कुलकर्णी, मंगला निपाणीकर ई. पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply