सराफ संघाकडून देवस्थान समितीला श्री अंबाबाईची ५१ किलो चांदीची मूर्ती

 

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्ती प्रदानप्रसंगी काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेत नागरिकांसह तालीम, मंडळे, संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी आज केले.कोल्हापूर सराफ व्यापारी संघाकडे अंदाजे ५१ किलो वजनाची चांदीची मूर्ती आहे. ती १ मार्च २०२२ रोजी विधिवत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द केली जाणार आहे. त्या निमित्ताने अंबाबाई मंदिर परिसरात शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या निमित्ताने रांगोळ्यांसह आकर्षक रोषणाईही केली जाणार आहे.या संदर्भात अधिक माहिती देताना श्री. गायकवाड म्हणाले, सराफ संघाकडे ३१ वर्षांपासून करवीर निवासिनी अंबाबाईची चांदीची मूर्ती आहे. दरम्यान, अंबाबाई मंदिरात असणाऱ्या मूळ मूर्तीचीही अभिषेकमुळे झीज होत आहे. याच कारणासाठी आम्ही ही मूर्ती देण्याचा सर्व संमतीने निर्णय घेतला. त्यासाठी रीतसर जिल्हाधिकारी कार्यालय आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून परवानगी घेऊन मूर्ती प्रदान करीत आहोत. यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवडे यांचे बहुमोल सहकार्य मिळाले.ते म्हणाले, एक मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता अंबाबाई मंदिर परिसरात मूर्तीसह शोभायात्रा निघेल. यावेळी रांगोळी, आकर्षक रोषणाईबरोबर वाद्यांचा गजरही असेल. यामध्ये नागरिकांसह तालीम, मंडळे, संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी.यावेळी उपाध्यक्ष जितेंद्र राठोड, सचिव अनिल पोतदार (हुपरीकर), संजय जैन, संचालक सुहास जाधव, सुरेश गायकवाड, सुरेंद्र पुरवंत, अमोल ढणाल, सुरेश राठोड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!