
कोल्हापूर:संजय घोडावत इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची मानसिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी पालकांनी ‘आप’कडे केल्या होत्या. यावर आम आदमी पार्टीच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडावा, अन्यथा आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता. याची दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी यावर सुनावणी घेण्याचे आदेश शिक्षण उप-संचालकांनी दिले होते. या तक्रारींवर सुनावणी घेण्यासाठी संजय घोडावत शाळा प्रशासन, संबंधित पालक व ‘आप’ पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते.एकाच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळी फी आकारली जात आहे. वार्षिक फी बद्दलचा निर्णय पालक-शिक्षक संघाच्या बैठकीत घेणे कायद्याने बंधनकारक असून देखील फी बद्दल कोणतीही चर्चा बैठकीत घेण्यास शाळा प्रशासन तयार होत नव्हते. कोरोनाच्या काळातील फी सवलतीबद्दल पालक-शिक्षक संघात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना स्कुलबस मधून मधल्या वाटेत उतरवून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य शाळा प्रशासनाने केल्याचे पालकांनी सुनावणी दरम्यान सांगितले. यावर ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी पालक-शिक्षक संघाची बैठक होते का नाही हे बघणे शिक्षण विभागाचे काम आहे, त्यात कसूर करू नये असे खडसावले. ज्या विद्यार्थ्यांना शाळेच्या बस मधून खाली उतरवण्याचे निर्देश दिले त्यांच्यावर काय कारवाई करणार असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला.
यावर उप-शिक्षणाधिकारी डी. एस पोवार यांनी
एकाच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळी फी घेणे नियमांना धरून नाही, फी वाढीचा निर्णय पालक-शिक्षक संघाच्या बैठकीतून होणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. पालक-शिक्षक संघाची बैठक बोलावून विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत असे प्रशासनाने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कुलच्या प्रतिनिधींना सांगितले. यावर पुढील महिन्याच्या 14 तारखेपर्यंत बैठक घेऊन निर्णय घेऊ असे शाळेचे प्रतिनिधी विराट गिरी यांनी सांगितले.यावेळी उपशिक्षणाधिकारी जी.टी. उकिरडे, ‘आप’चे जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, पालक दिलीप पाटील, शैलेश लुलानी, वासुदेव टोटला, वर्षाली मारुळकर, दीपा डकरे, राकेश हिंदुजा, भरत तिवारी, मुकेश पुनमिया, सागर सलगर, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कुलच्या मुख्याधिपिका सुस्मिता मोहंती व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply