सरकारने शब्द पाळला नाही म्हणूनच उपोषण : खा.संभाजीराजे छत्रपती

 

मुंबई / प्रतिनिधी:मराठा आरक्षण कधी मिळेल हे सांगता येत नाही. त्यासाठी वेळही लागू शकतो. पण आम्ही सात मागण्या केल्या होत्या. त्यापैकी एकही मागणी पूर्ण झाली नाही. १५ दिवसात या मागण्या मंजूर करतो म्हणून सरकारने सांगितलं होतं. पण आजतागायत त्यावर तोडगा निघाला नाही. त्यानंतर रायगड आणि नांदेडला आंदोलन करूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही. सरकारने शब्द पाळला नाही. त्यामुळे उपोषणाशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय राहिला नाही. म्हणूनच मी आजपासून उपोषणाला बसलो आहे, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी स्पष्ट केलं.
आझाद मैदानावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे. यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला.
आमरण उपोषण सुरू करण्यापूर्वी संभाजीराजे यांनी आझाद मैदानावर प्रसारमाध्यमंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. मी २००७ पासून महाराष्ट्रात फिरत आहे. मराठा आरक्षण का महत्वाचं आहे याची जाणीवजागृती केली पाहिजे असे संभाजीराजे यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठा समाजाला सोबत घेऊन गेले नाहीत तस सर्व समाजाच्या बारा बलुतेदारांना सोबत घेऊन पुढे गेले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मला उपोषण करावे लागत असल्याचे संभाजीराजे म्हणाले. आरक्षण मिळेपर्यंत गरिब मराठा समाजाने काय करायचे? असा सवाल देखील यावेळी त्यांनी केला. आरक्षण हे आमच्या हक्काचे आहे. माझ्यावर जबाबदारी आहे. आमरण उपोषण करणे कठीण काम आहे. परंतू, २००७ पासून हा मुद्दा मी पुढे नेत आहे, आत्ता जर काही केले नाही तर काय उपयोग, म्हणून मी उपोषण करत असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
१५ दिवसांत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतो अस सरकारने सांगितले होते. त्यानंतर आम्ही नाशिके मुक आंदोलन थांबवले होते. मात्र, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून मी हा निर्णय घेतला असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला 400 कोटींची घोषणा केली. मात्र, थोडेच पैसे आले. जेवढा आरक्षणाचा विषय महत्वाचा आहे, तेवढाच सारथीचा विषय महत्त्वाचा आहे. यात अनेक ठिकाणी केंद्र सुरु केली. मात्र, तेथील अडचणी सोडवल्या नाहीत असे संभाजीराजे म्हणाले.
ठाण्यात फक्त वसतीगृह सुरु झाली, तिही पालाकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने झाले. तुम्ही काय केलं? असा सवाल यावेळी संभाजीराजे यावेळी म्हणाले. ज्याच्यामुळे एवढे मोर्चे निघाले त्या कोपर्डीचे काय झालं? असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले. मी महाराष्ट्र पिंजून काढत असताना सर्वजण म्हणाले की, तुम्ही हे नेतृत्व केलं पाहिजे. २०१३ मध्ये मी लाखोंच्या संख्येने आंदोलन केले. ज्यावेळी जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता होती, त्यावेळी कोण मंचावर जात नव्हते, त्यावेळी मी गेलो आणि सर्वांना आवाहन केले असेही संभाजीराजेंनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!