केंद्र शासनाने राज्यपालांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी : शिवसैनिकांच्या संतप्त भावना

 

कोल्हापूर  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. छत्रपती शिवरायांबद्दल भावना, संवेदना नसतील, तर त्याविषयी बोलताना नको त्या विषयात नाक खुपसू नये. राज्यपालांचे छत्रपतींविषयीचे खरे विचार काल आपसूक बाहेर आले. त्यांच वय आणि वक्तव्य बघता त्यांना निवृत्तीची गरज असून, केंद्र शासनाने तात्काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची राज्यातून हकालपट्टी करावी व राज्यपालांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा शिवसेनेचा हिसका दाखवू, अशा संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “माफी मागा.. माफी मागा.. राज्यपाल माफी मागा”, “राज्यपाल भगतसिंग कोशारींची महाराष्ट्रातून हकालपट्टी झालीच पाहिजे” अशा घोषणानी परिसर दणाणून सोडला.
काल राज्याचे राज्यपाल यांनी नविन जावईशोध लावला. पदावर आहात, ज्येष्ठ आहात म्हणून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अपशब्द काढाल तर शिवसेना शांत बसणार नाही. छत्रपती अवमान महाराष्ट्रात कदापि खपवून घेतला जाणार नाही. राज्यपाल कोशारी यांनी भाजपचे लांगूलचालन सोडून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल पदास न्याय मिळेल असे काम करणे अपेक्षित आहे. परंतु, वयानुसार त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून, केंद्र शासनाने अशा मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीची महाराष्ट्र राज्यातून हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी शिवसैनिकांनी केली.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, माजी जिल्हाप्रमुख रवी भाऊ चौगुले, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, अरुण सावंत, किशोर घाडगे, अभिषेक देवणे, सुनील जाधव, तुकाराम साळोखे, रणजीत जाधव, सुनील भोसले, सुनिल खोत, रियाज बागवान, निलेश हंकारे, अभिजित कुंभार, अश्विन शेळके, राजू ढाले, राजू काझी, अंकुश निपाणीकर, दादू शिंदे, सचिन क्षीरसागर, कपिल नाळे, अर्जुन आंबी, कल्पेश नाळे, कपिल केसरकर, रमेश पोवार, शैलेश साळोखे, शैलेश गवळी आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!