
कोल्हापूर: नवभारताच्या उभारणीत विद्यार्थ्यांची अत्यंत कळीची भूमिका असणार आहे. त्या दृष्टीने आपल्या वैज्ञानिक व तंत्रज्ञानात्मक नवोन्मेषाच्या अभिव्यक्तीमध्ये कालसुसंगत संयुक्तिकता व मूल्य असले पाहिजे, याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यावी, कारण या बाबी जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी आणि शाश्वत उपाय प्रदान करतात, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी या संस्थेचे संचालक डॉ. दिनकर एम. साळुंके यांनी आज येथे केले.शिवाजी विद्यापीठाचा ५८व्या दीक्षान्त समारंभ आज मोठ्या उत्साहाच्या वातावरणात, पण कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन स्वरुपात साजरा झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्नातकांना संबोधित करताना डॉ. साळुंके बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. भगत सिंह कोश्यारी होते. विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ या युट्यूब वाहिनीवरुन प्रसारित झालेल्या या कार्यक्रमात सुमारे ३५०० जण ऑनलाईन सहभागी झाले. या कार्यक्रमाद्वारे ६२,३६० स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या.यशासाठी कोणतेही जादूचे सूत्र नसल्याचे सांगून डॉ. साळुंके म्हणाले, नवस्नातकांनी आता आयुष्याच्या आणि उच्चशिक्षणाच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करत असताना बौद्धिक चपळता वाढवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जेव्हा एखादी नवीन संधी येते, तेव्हा ती मिळवण्यासाठी तुम्ही सदैव तत्पर राहता आणि तुमच्या स्वतःच्या संधी निर्माण करण्यासाठीही तयार असता. विद्यार्थी म्हणून मिळवलेले शिक्षण आणि ज्ञान यावर आधारित तुमचा स्वतःचा मार्ग तयार केला पाहिजे. तुम्ही ज्याही क्षेत्रात जाल, तेथे प्रामाणिकपणा आणि बांधिलकी या दोन गुणांच्या बळावर सर्वोत्कृष्टतेच्या साध्यतेचा ध्यास घेऊन कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
Leave a Reply