डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा शनिवारी दीक्षांत समारंभ शिवाजी विद्यापीठ कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के प्रमुख अतिथी

 

कोल्हापूर :डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा १० वा दीक्षांत समारंभ शनिवार दिनांक १२ मार्च २०२२ रोजी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून दीक्षांत भाषण करणार आहेत. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना डी.लिट. तर प्रा. एस. आर. यादव यांना सन्माननीय डी.एस्सी. पदवीने सन्मानित केले जाणार आहे. हॉटेल सयाजी येथील व्हिक्टोरीया सभागृहात सकाळी ११.०० दीक्षांत समारंभ होणार असल्याची माहिती कुलपती डॉ संजय डी पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डीन राकेश कुमार शर्मा, परीक्षा नियंत्रक डॉ. ए. एन. जाधव, सल्लागार प्रा. अरुण पोवार, उपकुलसचिव संजय जाधव आदी उपस्थित होते.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची स्थापना २००५ साली झाली. विद्यापीठाने शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून सलग दुसऱ्यांदा नॅकचे “अ’ मानांकन प्राप्त झाले. २०१८ साली मानव संसाधन विकास मंत्रालच्या सर्वेक्षणामध्ये ९७ वा क्रमांक प्राप्त झाला होता. उत्कृष्ट तांत्रिकता पुरस्कारानेही विद्यापीठाला गौरवण्यात आले आहे. इंडिया टुडे व नेल्सनच्या सर्वेक्षणानुसार डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हे पश्चिम विभागात तिसरे व राष्ट्रीय स्ततरावर १५ वे उत्कृष्ट कॉलेज ठरले आहे. महाराष्ट्र इकॉनॉमिक समिट, मुंबई या संस्थेमार्फत ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार व ‘बेस्ट इन्स्टिटयूट’ म्हणून डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयास नुकतेच गौरविण्यात आले. विद्यापीठाकडून पीएच.डी. प्राप्त केलेले बहुसंख्य विद्यार्थी देश-विदेशात संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. वैद्यकीय व परिचारीका महाविद्यालयाच्या माध्यमातून कोल्हापूर परीक्षेत्रातील गरीब व गरजू रूग्णांना मोफत सेवा दिली जात आहे. आंतरशाखीय वैद्यकीय विषयात पदव्युत्तर व संशोधन अभ्यासक्रम व अल्पकालीन पॅरामेडिकल अभ्यासक्रमही सुरू असल्याचे डॉ. मुदगल यांनी यावेळी सांगितले. दीक्षांत समारंभाच्या सुयोग्य नियोजनासाठी विद्यापीठ स्तरावर १८ समित्यांची स्थापना करण्यात आली असून समन्वयकामार्फत सामीचे काम केले जात असलायचे त्यांनी सांगितले
दीक्षांत समारंभात डी. लिट. पदवीने सन्मानीत केले जाणारे डॉ. जयसिंगराव पवार महाराष्ट्रातील आघाडीचे इतिहास संशोधक, इतिहासकार व समाजप्रबोधक आहेत. ३० डिसेम्बर १९४१ रोजी जन्मलेले डॉ. पवार हे इतिहासाचे नामवंत प्राध्यापक असून ४० संशोधनात्मक ग्रंथ व ४५ शोधनिबंध त्यांनी लिहिले आहेत. त्यांच्या कार्याबद्दल २० सामाजिक व साहित्यिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते संस्थापक अध्यक्ष असून महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे संस्थापक संचालक आहेत.
मराठ्यांचा इतिहास आणि आधुनिक महाराष्ट्र हे त्यांचे संशोधन क्षेत्र असून राजर्षी शाहू छत्रपतींचे चरित्र सर्व जगभर प्रसारित करण्याचे मिशन त्यांनी हाती घेतले आहे. भारताच्या १५ व जगभरतील १० भाषांत शाहूचरित्र अनुवादित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प डॉ. पवार यांनी हाती घेतला आहे. आतापर्यंत मराठी, कन्नड, कोंकणी, उर्दू, तेलगू, हिंदी, सिंधी, गुजराती, इंग्लिश, जर्मन, रशियन इत्यादी भाषांत त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे.
डॉ. जयसिंगराव पवार यांना आजपर्यत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये ‘जिजामाता विद्वत-गौरव पुरस्कार’, ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार’, ‘कोल्हापूर भूषण’, ‘फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार’, ‘आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार’ आदीचा समावेश आहे.
डॉ. एस आर यादव यांना या सोहळ्यात सन्मानानीय डीएस्सी पदवीने गौरविण्यात येणार आहे. डॉ. यादव इंडियन नॅशनल सायन्स असोसिएशनचे ज्येष्ठ वैज्ञानिक म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या बाटनी विभागात ते कार्यरत आहेत. त्यांनी मुंबई विद्यापिठातून एमएस्सी व पी.एचडी पूर्ण केली आहे. गाईड म्हणून एमफीलच्या ११ व पीएच.डी. च्या २६ विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परीषदामध्ये त्यांनी सहभाग घेतला असून आतापर्यंत त्यांचे ३०३ रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत. ९ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. इंडियन असोसिएशन ऑफ अॅन्जिओस्पर्म टॅक्सोनॉमी, नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्स, महाराष्ट्र अॅकेडमी ऑफ सायन्स आणि नॅशनल अॅकेडमी नवी दिल्लीही फेलोशिप त्यांना मिळाली असून २० हून अधिक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. जपान, चीन , अमेरिका,इराण, नेपाल, ब्राझील आदि देशांना त्यांनी भेट दिली आहे. शिवाजी विद्यापिठातील वनस्पती उद्यान उभारणीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या सन्मानार्थ ९ प्रजातीना त्यांचे नाव देण्यात आले आहे. पश्चिम घाटातील वनस्पतींचा अभ्यास करून त्यांची जैव प्रणाली व धोक्यात आलेल्या जातीचे संवर्धन करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे.
दहाव्या दीक्षांत समारंभात एकूण ३६१ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे. यावेळी ९ विद्यार्थ्याना सुवर्ण पदकाने गौरवण्यात येणार असून डॉ. धनाजी बी. माळवेकर यांना ‘एक्सलन्स इन रिसर्च’ म्हणून सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या पत्रकार परिषदेला कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. शिंपा शर्मा, अधिप्ठाता डॉ. राकेश शर्मा, रिसर्च डायरेक्टर डॉ सी डी लोखंडे उपस्थित होते. कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले यांनी स्वागत केले. परीक्षा नियंत्रक  अजितसिंह जाधव यांनी दिल्या जाणाऱ्या पदव्यांची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!