दोन दिवसात ‘आप’चा उमेदवार जाहीर होणार; संदीप देसाईंचे नाव आघाडीवर

 

कोल्हापूर: उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. आ. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर खुल्या झालेल्या य जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेनेबरोबरच आम आदमी पार्टीने निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. पंजाबमध्ये विजय संपादन केल्यानंतर ‘आप’ने आता कोल्हापूर ‘उत्तर’ विधानसभा निवडणुकीत लक्ष घातले आहे.या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेश प्रभारी दुर्गेश पाठक यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे हे या निवडणुकीचे निरीक्षक म्हणून कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. प्रदेशाध्यक्ष राचुरे यांनी पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ‘उत्तर’ मधील तयारीचा आढावा घेतला. यामध्ये पक्षाचे शहरात असलेले संघटन, बूथवर असलेल्या कार्यकर्त्यांची संख्या याबाबत माहिती घेतली.या पोटनिवडणूकीसाठी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. यासोबतच एक माजी महापौर व माजी नगरसेविकेने देखील पक्षाकडे उमेदवारी मागितल्याचे समजते.आढावा बैठकीतून उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीची माहिती घेतली असून, लगेचच याचा अहवाल दिल्लीला पाठवणार असल्याचे निवडणुकीचे निरीक्षक राचुरे यांनी सांगितले. यावर निर्णय होऊन येत्या दोन दिवसात आम आदमी पार्टीचा उमेदवार जाहीर होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘आप’ या निवडणुकीत जोरदारपणे उतरणार असून दिल्ली, पंजाबचे नेते कोल्हापुरात प्रचारासाठी आणण्याची तयारी पक्षाने सुरू केली आहे. ‘आप’च्या एंट्रीने ही निवडणूक रंगतदार होणार आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांना ‘आप’चा ताप किती होतोय हे या निवडणुकीत पाहण्यासारखे असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!