स्टार एअरची कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ४ ऑक्टोबरपासून : खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

 

कोल्हापूर:कोल्हापूर-मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू व्हावी, अशी प्रवाशांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. या पार्श्‍वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनीही केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता, त्याला यश आले आहे. ४ ऑक्टोबरपासून स्टार एअरची कोल्हापूर-मुंबई विमानसेवा नियमितपणे सुरू होत आहे. या विमानसेवेमुळं कोल्हापूर- मुंबई असा प्रवास करणार्‍या प्रवाशांची सोय होणार आहे.स्टार एअरची कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ७२ प्रवाशांची क्षमता असलेले विमान ४ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी मुंबई विमानतळावरून उड्डाण करेल आणि १२ वाजून ५ मिनिटांनी ते कोल्हापूर विमानतळावर पोहोचेल. त्यानंतर १२ वाजून ३० मिनिटांनी कोल्हापुरातून विमानाचं उड्डाण होणार आहे, तर दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी विमान मुंबई विमानतळावर पोहोचेल. स्टार एअरचे प्रमुख पदाधिकारी श्रेणिक घोडावत यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया कोल्हापूर दौर्‍यावर आले असता, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातून मुंबई विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंत्री सिंधिया यांनी स्टार एअर आणि अलायन्स एअर कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करून, तातडीने कोल्हापुरातून विमानसेवा सुरू करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या होत्या. खासदार महाडिक यांनी स्टार एअर कंपनीकडे पाठपुरावा केल्यानंतर त्याला यश आले. आता ४ ऑक्टोबरपासून विमानसेवा सुरू होत आहे, त्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!