
पेशावर : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात सोमवारी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येने मंगळवारी ३०० चा टप्पा ओलांडला तर १९०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
पाकिस्तानचा खैबर पख्तुनख्खॉ प्रांत आणि अन्य ठिकाणी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २५० झाली. ७.५ रिश्चर स्केल क्षमतेच्या या भूकंपात १६०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
अफगाणिस्तानात ९० पेक्षा जास्त जण मरण पावले तर ३०० पेक्षा जास्त जखमी झाले. मरण पावलेल्यांची संख्या वाढण्याची भीती आहे.
गेल्या दहा वर्षांत एवढ्या तीव्रतेचा भूकंप प्रथमच झाला, असे जिओ न्यूजने म्हटले. खैबर पख्तुनख्वॉ (केपी) प्रांत आणि फेडरली अॅडमिनिस्टर्ड ट्रायबल एरियाजमध्ये (फाटा) २२८, पंजाबमध्ये ५ व पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ जण मरण पावले. खैबर पख्तुनख्वॉ प्रांतातील जखमींमध्ये मुलांचाही समावेश असून त्यातील अनेक जणांची प्रकृती चिंताजनक आहे. भूकंपग्रस्तांना नेमकी कोणती मदत हवी आहे व मदतीसाठीच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी सात पथके स्थापन करण्यात आली आहेत. पंतप्रधान नवाज शरीफ अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतले. त्यांनी मंगळवारी बैठक बोलावून मदत कार्याचा आढावा घेतला. शरीफ यांनी दुपारी शांगला भागात भूकंपग्रस्तांची भेट घेतली.लष्कराने दिलेल्या माहितीनुसार लष्करीदृष्ट्या महत्वाच्या काराकोरम महामार्गावर दरडी कोसळण्याचे ४५ प्रकार घडले. त्यातील २७ दरडी दूर करण्यात आल्या आहेत. संपूर्ण देशभर लष्करी रुग्णालयांची एकूण क्षमता ३० टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे.
Leave a Reply