
नवी दिल्ली : भारतीयांच्या जेवणातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या कांद्याचे दर ऑक्टोबरमध्ये २५ रुपयांच्या आसपास स्थिरावले. आता हाच कांदा पुन्हा सर्वसामान्यांना रडवण्याची चिन्हे दिसत आहेत. कांद्याच्या मागणी व पुरवठय़ात तफावत असल्याने आणि नवीन पीक कमी येणार असल्याने कांद्याचे भाव वाढू लागले आहेत. लासलगावच्या बाजारात कांद्याचा घाऊक दर ३२ रुपये किलोवर पोहोचला आहे.
लासलगावला कांद्याचा घाऊक दर ऑगस्टमध्ये ५७ रुपये किलो होता. त्यानंतर केंद्र सरकारने अनेक उपाययोजना करून कांद्याच्या दरांवर नियंत्रण मिळवले. ऑक्टोबरमध्ये कांद्याचे दर २५ रुपये किलोपर्यंत घसरले आहेत. मात्र, गेल्या आठवडय़ापासून कांद्याचे दर ३० रुपयांपेक्षा अधिक होण्यास सुरुवात झाली आहे. आता लासलगावला ३२ रुपये किलोने कांदा विकला जात आहे. घाऊक बाजारात कांदा वाढू लागल्याने त्याचे परिणाम दिल्ली व अन्य परिसरात कांद्याची दरवाढ झालेली दिसत आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्र, गुजरात व राजस्थानमधून नवीन कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र, यंदा पाऊस कमी झाल्याने कांद्याचे पीक कमी होण्याची शक्यता आहे. शेतीतज्ज्ञ व व्यापा-यांनी सांगितले की, राज्यात पाऊस कमी झाल्याने कांद्याचे खरीप पीक अपेक्षेपेक्षा कमी येणार आहे. नवीन पीक कमी होणार असल्याने कांद्याचे दर वाढू शकतात.
Leave a Reply