
कोल्हापूर: ज्ञानाची आणि विज्ञानाची कास धरून प्रकाशाच्या दिशेचे यात्री व्हा, यश सावलीसारखे तुमच्या पाठीशी राहील. याउलट यशाच्या मागे धावू लागाल, तर ते हुलकावण्याच देत राहील, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यापीठात नव्याने प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष स्वागत कार्यक्रमात संबोधित करताना ते बोलत होते.
सुमारे दीड तास कुलगुरू डॉ. शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपल्या व्यक्तीगत आयुष्यातले अनुभव, उदाहरणे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले. ते म्हणाले, आयुष्यामध्ये यश आणि समाधान या अत्यंत सापेक्ष गोष्टी आहेत. त्यांचे मोजमाप किती आणि कशावरुन करावयाचे, हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. त्यामुळे चांगल्या गोष्टी करीत जाणे, चांगले मित्र मिळवित जाणे आणि नातेसंबंध प्रस्थापित करीत राहणे हा सुद्धा यशाचा महत्त्वाचा भाग आहे. आपण यशस्वी होत असताना त्यामागे किती जणांचे हात आणि सदिच्छा आहेत, यावर त्या यशाचे महत्त्व अवलंबून असते. त्यामुळे चांगले काम करीत गेले की आपोआपच चांगली माणसे आयुष्यात जोडली जातात. जेव्हा मनुष्य जन्मतो, तेव्हा श्वास घेतो पण, त्याच्याकडे नाव नसते; आणि मरतो तेव्हा मात्र श्वास संपतो, पण नाव मागे कसे राखायचे, हे जिवंतपणीच्या आपल्या वर्तनावर अवलंबून असते. आयुष्यात लौकिकार्थाने कितीही मोठे यश मिळवा, पण एक चांगला, सच्चा माणूस म्हणून आपली ओळख निर्माण करा. तुमच्याबरोबर शिवाजी विद्यापीठाचे नावही उज्ज्वल करा, असे आवाहन त्यांनी केले
Leave a Reply