कोल्हापूर शहरालगतच्या गावांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी दिला स्वतंत्र विकास प्राधिकरणाचा पर्याय

 

20160830_220732मुंबई: कोल्हापूर महानगरपालिका हद्दीलगतच्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापण्याचा पर्याय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.

कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीबाबतची बैठक मुख्यमंत्र्यांच्या दालनात झाली. यावेळी हद्दवाढीसाठी अनुकूल व प्रतिकुल असलेल्या दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी हा पर्याय ठेवला. या बैठकीस महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, महापौर श्रीमती अश्विनी रामाणे, आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडीक, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, नितीन करीर, सचिव मनीषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलींद म्हैसकर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमितकुमार सैनी, पोलीस अधिक्षक प्रदीप देशपांडे, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, माजी आमदार संपतराव पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले की, राज्यातील शहरांच्या नागरीकरणात वाढ होत आहे. शहरांची वाढ होत असतांना शहरांबरोबरच शहरालगतच्या भागाचाही विकास होणे आवश्यक आहे. जेणेकरुन शहरांतील नागरीकांना मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करुन देता येतील. परंतु ज्याठिकाणी शहरांची हद्दवाढ करण्यासाठी अडचणी येतात. त्याठिकाणी जनतेला आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करुन त्या भागाचा विकास साधावा लागतो. अशी स्वतंत्र विकास प्राधिकरणे राज्यात मुंबई, पुणे, नागपूर या शहरात स्थापन करण्यात आली आहेत. या प्राधिकरणांच्या माध्यमातून या शहरांच्या लगतचा विकास करण्यात येत आहे. कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीबाबत अनुकूल व प्रतिकुल मतप्रवाह असल्याने शहराच्या विकासासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करणे हा मध्यम तोडगा आहे. यावर दोन्ही बाजूंच्या नागरिकांनी विचार करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
या प्राधिकरणाच्या माध्यमातून शहराचा नियोजनपूर्वक विकास करण्याबरोबरच ग्रामपंचायतींचे गावठाणाचे अधिकार अबाधित ठेवण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सुचविलेल्या पर्यायावर दोन्ही बाजूंच्‍या प्रतिनिधींनी विचारविनिमय करण्याचे आवाहन पालकमंत्री यांनी उपस्थितांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!