रांगड्या जीवांची भाबडी प्रेमकथा ‘तुझ्यात जीव रंगला’ झी मराठीवर ३ ऑक्टोबरपासून

 

मुंबई:कोल्हापुरी माणूस म्हटलं की डोळ्यासमोर येतो तांबड्या मातीतला रांगडा गडी.tjr-2रांगडेपणा हा इथल्या मातीचा आणि या मातीतील माणसांचा स्वभावधर्मच.. पण या रांगडेपणालाही प्रेमाची, मायेची एक नाजुकशी  झालर असते ज्यामुळेच इथल्या लोकांचा वेगळेपणा नजरेत भरतो. अशाच रांगडेपणातील प्रेमाची एक अलवार गोष्ट बघायला मिळणार आहे झी मराठीच्या आगामी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून. येत्या ३ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेची कथा आहे राणा आणि अंजलीच्या प्रेमाची. कोल्हापूरजवळच्या छोट्याशा गावात राहणारा राणा गायकवाड हा तालमीतला पहिलवान. तालमीचा आखाडा हेच त्याचं जीवन आणि कुस्ती हेच त्याचं प्रेम. राणाचे वडील प्रतापराव गायकवाड राजकारणी परंतु समाजसेवी वृत्तीचे.. गावच्या भल्यासाठी जे जे करता येईल ते सर्व काही करणारे. आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेल्या राणाकडे शेतीवाडीचा मोठा पसारा आहे. आखाडा आणि शेतीतच जास्त वेळ घालवणा-या राणाचं शिक्षणही जेमतेमच झालेलं. शरीराने जरी रांगडा असला तरी मनाने तो अतिशय हळवा आहे. गावातील प्रत्येकाच्या उपयोगी येणारा, सर्वांना मदत करणारा राणा मात्र मुलींच्या बाबतीत अतिशय लाजरा आहे. सच्चा पहिलवान तोच जो ब्रह्मचर्याचे पालन करतो आणि मुलींपासून दूर राहतो अशी शिकवण लहानपणापासूनच त्याच्या मनावर बिंबवली गेली आहे त्यामुळे तो मुलींपासून कायमच अंतर राखून वागतो. अशा राणाची भेट अंजलीशी होते. वडिलांच्या नोकरीतील बदलीमुळे त्या गावात आलेली अंजली ही एक सुशिक्षित मुलगी आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग गावातील मुलांनाही व्हावा म्हणून ती गावातील शाळेत शिक्षिकेची नोकरी करत आहे. राणा आणि अंजली दोघेही परस्परभिन्न स्वभावाचे.अंजली बोलघेवडी तर राणा भिडस्त स्वभावाचा. ती उच्चशिक्षित तर हा कमी शिकलेला. ती सर्वांशी मिळून मिसळून वागणारी तर राणा आपल्याच विश्वात रमणारा. दोघांचं हेच वेगळेपण दोघांना एकमेकांकडे आकर्षित करण्यास कारणीभूत ठरतं. या मालिकेच्या निमित्ताने  प्रथमच अस्सल ग्रामीण बाजाची आणि हिरव्यागर्द शेताच्या सोबतीने बहरणारी आगळी वेगळी प्रेमकथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!