
कोल्हापूर : आजकाल विकसित आधुनिक तंत्रज्ञामुळे जास्तीत जास्त कामे यंत्राद्वारे होऊ लागली आहेत. त्यामुळे शरीराच्या दृष्टीने आवश्यक व्यायाम पूर्णतः कमी आला आहे. याच कारणाने मनुष्यात मानसिक तणाव आणि शारीरिक व्याधी जन्म घेत आहेत, त्यामुळे दररोज व्यायामाद्वारे नागरिकांनी आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करून निरोगी जीवन व्यतीत करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. युवसेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून महावीर उद्यान येथे साकारण्यात आलेल्या ओपन जिमच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर सौ. अश्विनी रामाणे होत्या.
सकाळी आठ वाजता शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या महावीर उद्यान येथे ओपन जिमचे उद्घाटन आणि लोकार्पण पालकमंत्र.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते, महापौर सौ. अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली, आमदार राजेश क्षीरसागर आणि शिवसेना उपनेते विजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुंबई मध्ये ओपन जिमची संकल्पना मांडली. यास काहींनी विरोध केला पण ओपन जिम नागरिकांच्या आरोग्यास हितकारक असल्यानेच हा विरोध मागे घ्यावा लागला आणि ओपन जिमची संकल्पना सत्यात उतरली. त्याच धर्तीवर कोल्हापूर वासियांना सकाळी – संध्याकाळी फिरावयास येणाऱ्या नागरिकांना सहज वापरण्याजोग्या व्यायाम साधनाद्वारे व्यायाम करता यावा यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी विशेष पाठपुरावा केला. मुंबईच्या धर्तीवर आज कोल्हापूर शहरामध्ये सहा ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आले असून, आगामी काळामध्ये शहरात अजून २० ओपन जिम बसविण्याकरिता निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. जेष्ठ नागरिकांसह युवक आणि लहान मुलानाही ओपन जिमचा वापरण्यास उत्तम असून, या ओपन जिमद्वारे नागरिकांनी आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करावे. येणाऱ्या काळामध्ये शहराच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक निधी उपलब्ध करून शहराचा चेहरा बदलू, अशी ग्वाही पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. यासह उपस्थित जेष्ठ नागरिकांना जेष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी बोलताना महापौर सौ. अश्विनी रामाणे यांनी, कोल्हापूर शहरामध्ये अशी अनेक उद्याने असून, त्यांना विविध समस्या भेडसावत असल्याचे नमूद केले. महावीर उद्यान ही शहरातील मोठी बाग असून या ठिकाणी दररोज येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. परंतु या नागरिकांना आवश्यक सुविधा मिळत नाहीत. ही बाग सुसज्ज करण्याच्या दृष्टीने बागेचा विकास आराखडा तयार करून तो राज्य शासनाकडे महानगरपालिका सादर करेल. या बागेच्या विकासाकरिता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी विशेष प्रयत्न निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करीत पुढील काळात महावीर उद्यान पर्यटनाकरिता सुसज्ज करण्याचे आश्वासन ही महापौर सौ. अश्विनी रामाणे यांनी दिले.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, युवा सेना मा. आदित्यजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून शहरात सहा ठिकाणी ओपन जिम नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या असून, नागरिक त्याचा नियमित वापर करीत आहेत. शहरात अशाच २० ठिकाणी ओपन जिम प्रस्तावित करण्यात आल्या असून, याकरिता पालकमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. युती सरकार नागरिकांच्या हिताचे काम करीत असून, कोल्हापूर वासियांवरील टोलचे संकटही युती शासनाने घालवले आहे. येत्या काळात प्राधिकरणाद्वारे कोल्हापूरचा विकास करण्याकरिता पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने आपण प्रयत्नशील आहे. यासह महावीर उध्यानातील वॉकिंग ट्रॅक येत्या आठ दिवसात सुस्थितीत करण्याची ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
यानंतर शिवसेना उपनेते.विजय कदम, शिवसेना नगरसेवक राहुल चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन पोतनीस यांनी केले. तर आभार माजी उपमहापौर उदय पोवार यांनी व्यक्त केले.
यावेळी जेष्ठ नागरिक दिनानिमित्त विलासराव मंडलिक, नंदलाल मनचोदिया, श्रीकांत ढेरे, खानोलकर, विलास बनगे.भीमराव पाटील, लासचंद्र जैन.दादा साळवी, श्रीमती चव्हाण, श्रीमती भागवत, अशोक ऐनापुरे या जेष्ठ नागरिकांचे सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमास नगरसेवक राहुल चव्हाण, नगरसेवक अर्जुन माने, नगरसेवक दिलीप पवार, नगरसेवक प्रताप जाधव, सा.बा. विभागाचे उगिले, हास्य मंचचे नारायण कांझर आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply