प्रियांका चोप्रा निर्मित आशुतोष गोवारीकर यांचा ‘व्हेंटिलेटर’;झी स्टुडिओजची रसिकांना दिवाळी भेट

 

कोल्हापूर:कुटुंबात ज्याप्रमाणे प्रेम, आपुलकी, माया या गोष्टी असतात त्याचप्रमाणे रुसवे-फुगवे, राग लोभ आणि हेवेदावे ही आपसुकच येतात. एकत्र कुटुंबपद्धती ही जरी आपली संस्कृती असली तरी बदलत्या काळात ती सुद्धा बदलत चालली आहे. आज कुटुंबे विभक्त झाली असली तरी त्यांच्यातलं प्रेम संपलय असंही नसतं आणि अनेकदा एकत्र आले म्हणजे तिथे केवळ प्रेमच असतं असंही नसतं. शेवटी कुटुंब हे माणसांनीच बनतं आणि माणसाच्या स्वभावातले गुण त्यातही उतरणं स्वाभाविक असतंच.अशाच एका कुटुंबाची गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे व्हेंटिलेटर या चित्रपटामधून. एका घटनेमुळे एका जागी आलेलं कामेरकर कुटुंब आणि त्यातील सदस्यातून उलगडत जाणारे नात्यांचे विविध पदर हे अतिशय खुमासदार पद्धतीने सांगणारीगोष्ट या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीतील तीन मोठी नावे पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी एकत्र आली आहेत. आपल्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीतआपलं वेगळं स्थान निर्माण करणारी आजची आघाडीची अभिनेत्री बनलेली प्रियांका चोप्रा ‘व्हेंटीलिट’रमधून मराठी चित्रपटाच्या निर्मितीक्षेत्रात पदार्पण करत आहे हे विशेष. तर अनेक हिंदीचित्रपटांच्या यशामध्ये महत्त्वाचा वाटा असलेले आणि ‘फेरारी की सवारी’ सारखा हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक राजेश मापुसकर या चित्रपटामधून मराठी दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. हिंदीमध्ये एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर व्हेंटीलेटरमध्ये मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. यापूर्वी अनेक मराठी चित्रपटामधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे आशुतोष या चित्रपटाद्वारे तब्बल अठरा वर्षांनी पुनरागमन करत आहेत. मागील वर्षी दिवाळीत ‘कट्यार काळजात घुसली’सारखा संगीतमय नजराणा देणा-या झी स्टुडिओजने यावर्षी ही नात्यांची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीस आणली आहे.येत्या ४ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.कोल्हापुरात पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारताना दिग्दर्शक राजेश मापुसकर म्हणाले की, “व्हेंटिलेटर ही नात्यांची गोष्ट आहे.  यातील घटना आणि पात्र प्रत्येकाने कधी ना कधी तरी अनुभवली असतील अशीच आहेत त्यामुळे चित्रपट बघताना प्रेक्षक त्याच्याशी आपसुकच जोडला जाईल हा विश्वास आहे.  कुटुंबात आणि नात्यात हरवत चाललेल्या संवादाची गोष्ट मार्मिक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय जो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”या चित्रपटात काम करण्याच्या अनुभवाबद्दल आशुतोष गोवारीकर म्हणाले की,” दिग्दर्शनात व्यस्त असताना पुन्हा कधी अभिनयाकडे वळेन असं कधीच वाटलं नव्हतं. परंतु यातील राजा कामेरकर या व्यक्तिरेखेसाठी मीच कसा योग्य आहे याबद्दलची खात्री राजेश मापुसकर बाळगुन होते. यासाठी त्यांनी खुप आग्रह केला आणि प्रियांकानेसुद्धा निर्माती म्हणून विश्वास दाखवला आणि मी ही भूमिका स्वीकारली.  मला या चित्रपटाची गोष्ट खुप आवडली.

 या चित्रपटात आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, संजीव शाह, सतीश आळेकर, अच्युत पोतदार, सुकन्या कुलकर्णी-मोने, सुलभा आर्या, उषा नाडकर्णी, निखिल रत्नपारखी, नम्रता आवटे-सांभेराव, निलेश दिवेकर यांसह अनेक लोकप्रिय कलाकार या चित्रपटात बघायला मिळणार आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद राजेश मापुसकर यांचे असून छायाचित्रण सविता सिंह यांचे आहे. चित्रपटात दोन गाणी असून ती मनोज यादव आणि शांताराम मापुसकर यांनी लिहिली असून रोहन-रोहन या संगीतकार द्वयीने ती संगीतबद्ध केली आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!