
कोल्हापर : शिवाजी विद्यापीठात दरवर्षीप्रमाणे यंदाही राबविण्यात आलेल्या परिसर स्वच्छता अभियानास शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक तसेच विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साही व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नियमित परिसर स्वच्छतेबरोबरच प्लास्टीकमुक्ती हे यंदाच्या स्वच्छता अभियानाचे वैशिष्ट्य ठरले. याअंतर्गत विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टीक कचऱ्याचे स्वतंत्र संकलन करण्यात आले.शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रेरणेतून आणि बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ.व्ही.एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे व विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. डी.के. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी साडेसात ते दहा या कालावधीत अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले. बीसीयुडी संचालक डॉ. मोरे यांनी उपस्थितांना संबोधित करून अभियानाचे उद्घाटन केले. ‘शिवाजी विद्यापीठाचा परिसर हा कोल्हापूरकरांबरोबरच देशविदेशांतून येणाऱ्या मान्यवर अभ्यागतांच्या कौतुकाचा विषय आहे. त्याचे पावित्र्य स्वच्छतेच्या माध्यमातून जपणे हे प्रत्येक घटकाचे कर्तव्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीनिमित्त देशव्यापी स्वच्छता अभियान राबविण्याची घोषणा केली; त्याआधी एक वर्ष विद्यापीठ हे अभियान स्वेच्छेने राबवित आहे. त्याला सर्वच घटकांचा लाभणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे,’ अशा शब्दांत डॉ. मोरे यांनी मार्गदर्शन केले आणि अभियानास प्रारंभ केला.अभियानाअंतर्गत विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी इमारतीपासून ते एनसीसी भवन गेटपर्यंतच्या परिसरातील अनावश्यक तण, घनकचरा तसेच प्लास्टीक कचरा साफ केला. यात गोळ्या-चॉकलेट्सचे रॅपर, प्लास्टीक पिशव्या, सॉफ्टड्रिंक व पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, रिकामे पेन, विविध वस्तूंचे रॅपर आदींचा समावेश होता. विविध अधिविभागांनी आपापल्या परिसराची स्वच्छता केली. बीसीयुडी संचालक डॉ. मोरे यांच्यासह प्रभारी कुलसचिव डॉ. शिंदे व विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. गायकवाड यांनी लोककला केंद्रासमोरील परिसरातील प्लास्टीक कचरा गोळा केला. त्यानंतर त्यांनी परीक्षा भवनसह कॅम्पसवरील प्रत्येक अधिविभागाला प्रत्यक्ष भेट देऊन स्वच्छता अभियानाची पाहणी केली. तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन व कौतुक केले. अभियानानंतर मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पोर्चमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. त्यानंतर गांधी अभ्यास केंद्राच्या संचालक डॉ. भारती पाटील यांनी उपस्थितांना अहिंसा व शांततेची तर डॉ. गायकवाड यांनी स्वच्छतेची शपथ दिली.
Leave a Reply