राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग सदस्यपदी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

 

कोल्हापूर20161105_153744: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात हा आणखी एक मानाचा तुरा या नियुक्तीमुळे खोवला गेला आहे.

महाराष्ट्र शासनाने राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग नुकताच पुनर्गठित केला. दि. २८ ऑक्टोबर २०१६ रोजीच्या अधिसूचनेद्वारे पुनर्गठित आयोगाची आणि नियुक्त सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. डॉ. अनिल काकोडकर आयोगाचे चेअरमन असून डॉ. ए.व्ही. सप्रे सदस्य सचिव आहेत.

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची आयोगावर निवड झाल्याने विज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांच्या संशोधन कार्याचा आयोगाला आणि त्या अनुषंगाने राज्याला मोठा लाभ होणे अपेक्षित आहे. डॉ. शिंदे यांचे औषधनिर्माण शास्त्रातील संशोधनात मोठे योगदान असून त्यांच्या नावे तीन पेटंट नोंद आहेत, तर आणखी दोन पेटंटसाठी अर्ज दाखल केले आहेत. कुलगुरू डॉ. शिंदे सध्या महाराष्ट्र शासनाच्या नवीन महाराष्ट्र विद्यापीठे कायदा, विद्यापीठे सेल्फ फायनान्स निवड समिती, तालुकानिहाय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांना वित्तसाह्यविषयक टास्क फोर्स तसेच सेटच्या सुकाणू समितीवरही कार्यरत आहेत.

या नियुक्तीसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, मा. राज्यपाल महोदय आणि महाराष्ट्र शासन यांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे, तो सार्थ करण्यासाठी या आयोगाच्या माध्यमातून राज्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीसाठी पुरेपूर योगदान देण्याचा माझा प्रयत्न राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!