कोल्हापूर : शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील आधार मतीमंद विद्यालयातील एका अल्पवयीन मुलाचा कुपोषणाने शनिवारी सी.पी.आर रुग्णालय येथे मृत्यू झाला. यासह याच संस्थेतील आणखी दोन मुलांसह एकूण सात मुलांवर सी.पी.आर रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत. कुपोषनाने पिडीत असललेल्या मुलांची आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी सी.पी.आर मध्ये भेट घेऊन विचारपूस केली. अनाथ, मतीमंद, अपंग बालकांची हेळसांड करणाऱ्या संस्थाचालकांवर कठोर कारवाई करून या संस्थाची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी अशी मागणी येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये करणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी बोलताना दिली. या बालकांवर करण्यात येणाऱ्या उपचाराची माहिती डीन रामानंद यांनी दिली.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, शाहूवाडी तालुक्यातील आधार मतीमंद विद्यालयातील एका अल्पवयीन मुलाचा सी.पी.आर रुग्णालयात मृत्यू झाला याच विद्यालयातील आणखी दोन मुले रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. तीन महिन्यापूर्वी याच विद्यालयातील एक विद्यार्थ्याचा अशाचप्रकारे मृत्यू झाला होता. हा सर्व प्रकार अतिशय गंभीर असून, मृत झालेल्या मुलांच्या उपचारामध्ये रुग्णालयाकडून कोणती कमतरता राहिली का? अशा प्रकारच्या जीवघेण्या घटना घडत असताना यावर कोणाचे नियंत्रण नाही. यास कोण जबाबदार आहे. हॉस्पिटल उपचारात कोणतीही कमतरता राहिली नसल्याचे सांगते पण उपचार दरम्यान मुलाचा मृत्यू झाल्याने अशा प्रकरणात रुग्णालयाचे नाव खराब होते. अशा प्रकारची घटना घडत असल्यास लोकप्रतिनिधी आणि अभ्यागत समिती सदस्य या नात्याने रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती देणे गरजेचे होते. रुग्णालयामध्ये या मुलांकरिता वेगळा वॉर्ड तयार करून त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सेवा सुविधा पुरविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याच बरोबर मान्यता संपूनही बेकायदा कार्यरत असणाऱ्या सदर संस्थेची माहिती मागून संस्थेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करून संस्थाचालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
यावेळी सदर विभागाचे प्रमुख डॉ. वसंत पाटील, या संस्थेची मान्यता रद्द करण्या करिता अहवाल सादर केल्याचे सांगत या संस्थेची सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. शासनाच्या नियमानुसार अशा संस्थातील मुलांची २ महिन्यातून एकदा तपासणी करणे बंधनकारक असल्याचे सांगितले.यावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी, दोन महिन्यापूर्वी या मुलांची तपासणी केली तेंव्हा तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना ही गोष्ट निदर्शनास आली नाही का? असा सवाल उपस्थित करीत अधिकारी ही असा संस्थाना सामील असल्याने संस्थाचा बेकायदा कारभार चालू असल्याचा आरोप केला. यावेळी बालरोग विभागाच्या डॉ. कुंभोजकर यांनी या मुलांवर सुरु असलेल्या औषधोपचाराची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांना दिली. यावेळी सी.पी.आर अभ्यागत समितीचे डॉ. अजित लोकरे, अजित गायकवाड, सुनील करंबे, शिवसेनेचे सुनील खोत आदी उपस्थित होते
Leave a Reply