
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची वॉक्हार्ट फाऊंडेशनच्या ‘एज्युकेशन पॉप्युलर अवॉर्ड-२०१६’साठी ‘लोकप्रिय कुलगुरू’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
वॉक्हार्ट फाऊंडेशन ही सामाजिक व आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत असलेली एक अग्रमानांकित अशासकीय संस्था आहे. त्यांच्यातर्फे दरवर्षी विविध क्षेत्रांत प्रभावी कामगिरी करणाऱ्या देशभरातील मान्यवरांची ज्युरींमार्फत निवड करण्यात येते. त्यापैकी एकास पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या निवडीसाठी मोबाईल/ दूरध्वनीद्वारे जनमत आजमावले जाते. लोकप्रिय कुलगुरू या पुरस्कारासाठी ज्युरी पॅनलने देशभरातून राज्य विद्यापीठांचे दोन, केंद्रीय विद्यापीठाच्या एक, महिला विद्यापीठाच्या एक व खाजगी विद्यापीठाच्या एक अशा पाच कुलगुरूंची अंतिम फेरीत निवड केली होती. अंतिम लोकप्रियता फेरीत मिस्ड कॉलद्वारे जनमत आजमावण्यात आले. यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना सर्वाधिक ३४,५३६ मते प्राप्त झाली. आज वॉक्हार्ट फाऊंडेशनतर्फे ई-मेलद्वारे या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे कळविण्यात आले. फाऊंडेशनच्या वेबसाईटवरही हा निकाल घोषित करण्यात आला आहे.
या पुरस्काराच्या घोषणेनंतर मतदात्यांचे मनापासून आभार मानताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, वॉक्हार्ट फाऊंडेशनच्या ‘एज्युकेशन पॉप्युलर ॲवॉर्ड-२०१६’साठी ‘लोकप्रिय कुलगुरू’ पुरस्कारासाठी ज्युरींमार्फत अंतिम पाच कुलगुरूंमध्ये निवड झाल्यानंतर अंतिम टप्प्यात लोकप्रियतेची पडताळणी करण्यासाठी नागरिकांकडून विशिष्ट मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉलमार्फत जनमत आजमावण्यात आले. यामध्ये ‘एक व्यक्ती- एक मूल्य’ या लोकशाही मूल्यावर आधारित निवड प्रक्रियेमध्ये ३४ हजारांहून अधिक नागरिकांनी माझ्या बाजूने कौल दर्शविला. त्यामुळे उपरोक्त पुरस्काराचा मी, नव्हे; तर, माझे शिवाजी विद्यापीठ मानकरी ठरले, याचा मला अतिशय आनंद आहे. देशात विविध क्षेत्रांत गौरविल्या जात असलेल्या राज्यातील अग्रमानांकित शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू या नात्याने आपण माझ्यावर जो विश्वास दाखविला, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून ऋणी आहे. आपले माझ्यावरील प्रेम असेच अबाधित, अखंडित राहावे, ही अपेक्षा. आपल्या विश्वासाला आणि प्रेमाला पात्र राहण्यासाठी या पुढील काळातही मी सदैव कार्यरत राहीन, याची या निमित्ताने मी आपणा सर्वांना ग्वाही देतो. सर्व शिक्षक, प्राचार्य, विद्यार्थी, सर्व संबंधित घटक आणि नागरिक यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल पुनश्च धन्यवाद, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
वॉक्हार्ट फाऊंडेशनच्या अन्य शैक्षणिक पुरस्कारांचे विजेते असे: श्रीमती दीप्ती दत्त (शिक्षणतज्ज्ञ), अरविंद पनगारिया (प्रसिद्ध प्राध्यापक), आनंदकमल मिश्रा (शिक्षण क्षेत्रातील उत्तम अशासकीय संस्था), डॉ. के. कस्तुरीरंगन (उत्कृष्ट भारतीय विद्यापीठ), भास्कर राममूर्ती (आयआयटी प्रमुख), जनत शाह (उत्कृष्ट भारतीय व्यवस्थापन संस्था).
Leave a Reply