
कोल्हापूर : भारत कॅशलेस अर्थ व्यवस्थेच्या दृष्टीने पावले टाकत असून त्यासाठी डिजिटल पेमेंट पध्दतीचा मोठ्या प्रमाणात अवलंब करण्यात येत आहे. डिजिटल पेमेंट पध्दतीबाबत तळागळात, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी बँकांनी आर्थिक साक्षरता कँम्प मोठ्या प्रमाणात घ्यावेत, असे सांगून जिल्ह्यात विविध बँकांमध्ये सुमारे 54 लाख खाती आहेत. यापैकी 20 लाख बँक खाती अद्यापही आधार कार्डशी लिंक नाहीत. ती त्वरीत बँकांनी आधार कार्डशी जोडावीत. प्रत्येक बँकेने एक गाव कॅशलेस करण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले.
जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक प्रबंधक पी.एस.पराटे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदु नाईक, डीआरडीएचे प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.जी.किणिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाजातील दुर्बल घटकांबाबत बँकांचे धोरण सकारात्मक व सहानभुतीचे असावे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी डिजिटल पेमेंट सुविधांमध्ये आधार क्रमांक अत्यंत महत्वाचा असून बँकांनी सर्व खाती आधारशी लिंक करावीत, असे सांगितले. अद्यापही जिल्ह्यातील 20 लाख बँक खाती आधारशी लिंक नाहीत ती त्वरीत लिंक करण्यासाठी बँकांनी अधिक प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी डिजिटल पेमेंट पध्दतीच व्यवहार करावेत, असेही त्यांनी यावेळी सुचित केले.
रुपे कार्ड, क्रेडिट, डेबिट कार्ड, एटीएम आदि कार्डांचे वितरण खातेदाराला करत असताना ती ॲक्टीव्हेट करुन देण्याचीही दक्षता घ्यावी, असे सांगून प्रत्येक बँकेने कॅशलेससाठी निवडलेल्या गावात नियोजनपूर्वक प्रयत्न करावेत त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा बँकांना सर्वातोपरी मदत करेल. कार्डस्, पीओएस, युएसएसडी, एईपीएस, युपीआय, वॅलेट आदी प्रणाली डिजिटल पेमेंट सिस्टिममध्ये उपयोगात आणल्या जातात. यातील कोणत्या पध्दतीवर भर द्यायचा हे बँकांनी स्वत:च्या निरीक्षणातून ठरवावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक बँक शाखेने रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाप्रमाणे आर्थिक साक्षरतेसाठी महिन्यातून किमान एकवेळ ग्रामीण भागामध्ये आर्थिक साक्षरता कार्यक्रम घेणे आवश्यक असल्याचेही डॉ. सैनी यांनी स्पष्ट केले.
यावेळी कॅशलेस इकॉनॉमिच्या वाटचालीच्या या संक्रमण काळात बँकांनी अत्यंत संयमाने व परिश्रमपूर्वक परिस्थिती हाताळली, जिल्ह्याती कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ दिला नाही याबद्दल प्रशासनाच्या वतीने बँकांचे अभिनंदन केले. तसेच डिजिटल पेमेंट पध्दतीबाबतचे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनही यावेळी करण्यात आले.
Leave a Reply