
कोल्हापूर- आज पुरोगामी, डाव्या विचारसरणीचे लोक हिंदु धर्म-संस्कृती यांना बुडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काही लोक परकीय साहाय्य घेऊन हिंदु धर्मावर आघात करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. अशा वेळी हे आक्रमण परतवून लावण्यासाठी आपल्याला सामूदायिक कृती करावी लागेल. हिंदुत्वाचे जे कार्य करतात असे गणेश मंडळे, तरुण मंडळे, सामाजिक मंडळे यांतील तरुणांमध्ये हिंदुत्वाचे बीज रोवण्यासाठी प्रयत्न करा, असे मार्गदर्शन सातारा येथील ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज यांनी केले. ते गोकुळ-शिरगाव येथील श्री भगवती मंगल कार्यालयात झालेल्या एक दिवसीय प्रांतीय अधिवेशनात बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातनच्या संत सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये उपस्थित होते. या अधिवेशानसाठी बेळगाव, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या वेळी सातारा येथील पू. विठ्ठल स्वामी यांचीही वंदनीय उपस्थित होती.
प्रारंभी सनातनच्या संत सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी अधिवेशनाचा उद्देश स्पष्ट केला. अधिवेशनासाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी पाठवलेल्या संदेशाचे वाचन सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी केले.

Leave a Reply