
कोल्हापूर : सामाजिक सुसंवाद प्रस्थापनेत राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) प्रभावी भूमिका बजावू शकते, असे मत राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंखे यांनी आज येथे व्यक्त केले.शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने आयोजित पाच दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळेत तिसऱ्या दिवशीच्या प्रथम सत्रात ते ‘ग्रामीण विकासाची व्यूहरचना’ या विषयावर बोलत होते.
डॉ. साळुंखे म्हणाले, सध्या समाजात संवादाची मोठी दरी निर्माण झाली आहे. सामाजिक संबंधांमध्ये कोरडेपणा वाढतो आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक संवाद वाढीला लावून सामाजिक नातेसंबंधांमध्ये ओलावा निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम आपल्याला करावयाचे आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण विकासासाठी लॅब टू लँड आणि लँड टू लॅब या पद्धतीने काम करावे लागेल. विद्यापीठांची प्रयोगशाळा ग्रामीण विकासासाठी वापरावी लागेल. मृदा परीक्षण, जल परीक्षण या माध्यमांतून शेतीच्या विकासात योगदान देणे आवश्यक आहे. एनएसएसच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास उपक्रम, इंग्लीश स्पिकींग कोर्सही राबविण्याची गरज आहे.
डॉ. प्रमोद पाब्रेकर यांनी ‘स्मार्ट व्हिलेज’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, एनएसएस हे ग्रामीण परिवर्तनाचे सशक्त माध्यम आहे. स्मार्ट व्हिलेजसाठी संबंधित गावातील तरुणांची मते जाणून घेऊन आराखडा तयार करा. प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. विद्यापीठाच्या एनएसएसचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला.प्रा. डी.जी. चिघळीकर यांनी आभार मानले. यावेळी प्रा. सुरेश शिखरे, प्रा. एस.एम. मोरे, प्रा. एस.एन. जाधव, युवा जागर अभियानाचे यशवंत शितोळे उपस्थित होते.
Leave a Reply