सर्वात मोठे विमान उड्डाण करणार मुंबईतून

 

मुंबई :मुंबई विमानतळावर मे, २०१६पासून आणखी एक एअरबस ए३८० हे डबलडेकर सुपरजम्बो विमान उड्डाण करू लागणार आहे. ही सेवा एतिहाद एअरवेजची असून, मुंबई ते अबुधाबी व पुढे अबुधाबी ते न्यूयॉर्क असा प्रवास करण्याची सोय त्यामुळे प्रवाशांना उपलब्ध होईल. सिंगापूर एअरलाइन्सने मुंबईत सर्वप्रथम ए ३८० या जगातील सर्वात विशाल विमानाचे उड्डाण सुरू केले, मात्र सध्या त्यांची ही सेवा बंद आहे, तर त्यानंतर सुरू झालेल्या एमिरेट्स एअरलाइन्सचे ए ३८० उड्डाण सुरू आहे.

मुंबई विमानतळावर हे मोठे विमान येणार असल्यास त्यासाठी एस गेट हे मोठे प्रवेशद्वार उपयोगात येते. कारण दुमजली विमानातून मोठ्या संख्येने प्रवासी उतरून ते लवकर उड्डाणासाठी मोकळे करायचे असते. टी२ या टर्मिनलवर आणखी एक एस गेट बांधण्याची योजना आहे. मात्र ते अजून आकारास आलेले नाही. एतिहाद एअरवेजच्या १ मेपासून सुरू होणाऱ्या एअरबस ए ३८० विमानाचे वैशिष्ट्य म्हणजे या विमानात असलेला तीन रूम्सचा महाल. द रेसिडेन्स या नावाने हा महाल ओळखला जातो. याव्यतिरिक्त ९ फर्स्टक्लास अपार्टमेंट्स, ७० बिझनेस स्टुडिओ आणि ४१५ इकॉनॉमी श्रेणीच्या सीट्स असा मोठा डोलारा या विमानात असेल. सध्या त्यांच्या अशा पाच सेवा जगभरात सुरू आहेत. मुंबईहून उडणारे विमान दररोज रात्री ९.३५ वाजता अबूधाबीकडे प्रयाण करील. आता अबुधाबीमध्ये अमेरिकेतील इमिग्रेशन सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!