
कोल्हापूर : स्त्री व पुरुष अशा दोघांनाही कुटुंबाचा आर्थिकस्तर उंचवावा यासाठी प्रयत्न करावेत. नारी शक्तीने त्यासाठी पुढे यावे; कष्ट करावे; असे आवाहन करुन प्रत्येकाच्या हाता काम देण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. त्यासाठी रोजगार स्वयंरोजगाराच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. महिला, पुरुष, तरुण, तरुणी अशा साऱ्यांनी जास्तीत जास्त काम करावे आणि प्रगतीचे ध्येय गाठावे असे, आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
महिला स्वयंसहायता समूहाने तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळण्याच्या उद्देशाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने 11 ते 15 मार्च 2017 या कालावधीत जिल्हास्तरीय ताराराणी महोत्सवाचे आयोजन खराडे कँम्पस, शिवाजी पेठ, रंकाळा येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. विमल पाटील, महापौर हसिना फरास, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, माजी महापौर सई खराडे, बांधकाम सभापती सिमा पाटील, शिक्षण व अर्थ सभापती अभिजीत तायशेटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी स्वयंसहायता बचत गटांची चळवळ प्रभावी मार्ग ठरत आहे. या माध्यमातून महिलांची एक नवी शक्ती निर्माण होत आहे. बचत गटांच्या माध्यमातून संघटीत होणाऱ्या महिलांना प्रशिक्षित करणे, त्यांना कमी व्याज दरात कर्ज मिळवून देणे, त्याच बरोबर बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाला बाजार पेठ मिळवून देणे यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. तालुकास्तरावर त्यांच्यासाठी विक्री केंद्रे निर्माण व्हावीत यासाठी प्रयत्न होत आहे. बचत गटांनी वस्तुंचे उत्पादन करत असताना गुणवत्ता राखावी तरच ते बाजार पेठेत टिकू शकतील, असे सांगून ताराराणी महोत्सवात सहभागी बचत गटांच्या वस्तुंची विक्री व स्तुती या दोन्हीसाठी पालकमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.
खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यातील अनेक बचत गट राज्य व राष्ट्रीय पातळीवरती नाव लौकिक मिळवत आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या कला गुणांना वाव मिळत आहे. त्यासाठी ताराराणी महोत्सव हे एक सक्षम व्यासपीठ ठरत आहे. बचत गटांनी एकत्र येवून विविध उद्योग सुरु करावेत आणि गावातील लोकांनी त्यांना साथ द्यावी. उद्योग उभारत असताना उत्पादीत मालाचा दर्जा बचत गटांनी कटाक्षाने राखावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, केवळ वस्तुंच्या उत्पादनातच नव्हे तर निर्मल ग्राम, स्वच्छता अभियान, वृक्षारोपन या सारख्या अनेक सामाजिक उपक्रमांमध्येही बचत गटांचे काम उल्लेखनीय ठरत आहे. महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असून हे सक्षमीकरण महिलांच्या फक्त आर्थिक स्वावलंबनापुरतेच मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढविणे आवश्यक आहे. जिल्ह्यात एकूण 14825 बचत गट असून 5425 बचत गट दारिद्रय रेषेखालील आहेत. विविध व्यवसायांसाठी 4353 बचत गटांना 55 कोटी 63 लाख रुपये अर्थसहाय उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या रक्कमेतून बचत गटांनी शेती अधारीत व बिगर शेती अधारीत व्यवसाय सुरु केले आहेत. या मध्ये दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुट पालन, शालेय पोषण आहार, अंगणवाडी पोषण आहार, घरगुती खानावल, भाजीपाला विक्री, स्टेशनरी दुकाने, कापड दुकाने, मेटल ज्वेलरी, पिठाची गिरणी, अगरबत्ती,द्रोण पत्रावल्या आदी व्यवसायांची उभारणी केली आहे. ग्रामीण भागातील या बचत गटांना बाजार पेठ मिळवून देण्यासाठी ताराराणी महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या बचत गटांना मुद्रा योजनेंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
सन 2017 मध्ये शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथील दावल मलिक बचत गटास जिल्हास्तरावर प्रथम तर विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक मिळाला आहे. त्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. यावर्षी महोत्सवात 158 गटानी सहभाग घेतला असून 119 गट विविध वस्तुंचे तर 39 गट खाद्य पदार्थांचे आहेत.
Leave a Reply